anandi

आपला देश, आपली संस्कृती हा आपला सगळ्यांचाच खूप आत्मीयतेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. पण कधीकधी काही घटना अस्वस्थ करतात. एक समाज म्हणून आपण नेमक्या कोणत्या दिशेने जातोय याबद्दल विचार करायला भाग पाडतात.

काही आठवडय़ांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या दंगलींच्या पाश्र्वभूमीवर सोशल मीडियावर मतं-मतांतरं, चर्चा, ऊहापोह यांना उधाण आलं होतं. माझ्या एका कलाकार मित्राने ‘भगवे वादळ’ या शब्दांआडून केल्या जाणाऱ्या चिथावणीला लक्ष्य करत असं लिहिलं होतं की, ‘‘भगवंच काय पण निळं, जांभळं, तांबडं, पांढरं, मजेंठा, इंडिगो कुठलंच वादळ नकोय आपल्याला. हिंमत असेल तर भगवी शांतता आणून दाखवा ना! मग कळेल तुमचं शौर्य.’’ अनेकांनी त्याच्या कमेंट बॉक्समध्ये आपले ‘रंग’ उधळले. काहींनी त्याला ‘कलाकारांनी या भानगडींमध्ये बोलू नये. तू आपलं काम कर’ असे अनाहूत सल्ले दिले. ही मात्र प्रचंड डोक्यात जाणारी गोष्ट आहे. कलाकारांनी अमुक विषयावर बोलावं, तमुक विषयावर बोलू नये, असं सांगणाऱ्यांचा केवळ रागच येत नाही तर कीव वाटते. कलाकार हासुद्धा एक माणूस आहे. त्याच्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम होणं साहजिक आहे. आणि ‘व्यक्त होणं’ हा कलाकाराचा धर्म आहे. एखाद्या कलाकाराची कला ही त्याला मिळालेली तालीम, त्याने केलेली साधना यांच्याचबरोबर त्याची जडणघडण, संस्कार, जीवनशैली, अनुभव आणि चिंतन यांचा एकत्रित परिणाम असते. पण हे समजू न शकणाराही एक वर्ग असतो. असो. पण बहुतेकांनी शांतता राखण्यात खरं शौर्य आहे, हा विचार उचलून धरला.

भारत हा मुळातच शांतताप्रिय देश आहे. इतका प्रचंड विस्तार असलेल्या देशात एकासारखा दुसरा प्रदेश नाही. प्रत्येकाचा भूगोल वेगळा, हवामान वेगळं, भाषा वेगळी, आचार-विचार वेगळे! पण ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वज्ञानावर बहुतांश जनता या शांततेची काळजी घेत आली आहे. आणि या शांततेच्याच जिवावर आपल्याकडे लोकशाही नांदते आहे. पण तरीही हे अंतर्गत कलह अधूनमधून डोकं वर काढत असतात आणि या शांततेला गालबोट लावतात.

माणूस शांत असेल तर समाज शांत असेल. शांततेशिवाय माणसाची आणि पर्यायाने समाजाची प्रगती अशक्य आहे. प्रगतीच काय पण अशांततेत, अराजकतेत रोजचं जगणंही अवघड आहे. पण इतकं साधं गणित न समजणारे आणि काहीही भरवलं जाऊ शकेल अशी रिकामी डोकी घेऊन जगणारे लोक जेव्हा आपण पाहतो, तेव्हा निराशेबरोबरच भीतीही वाटते. यांनाच हाताशी घेऊन काही मेंदू दंगे आखतात. िहसाचार घडवून आणतात. आणि यात भरडला जातो तो सर्वसामान्य, निरपराध माणसांचा शांतताप्रिय समाज. कधी धर्माच्या नावाने, कधी इतिहासाच्या नावाने, कधी जात-पंथाच्या नावाने माणसा-माणसांमध्ये फूट पाडण्याची ही नीती आता आपल्याला नवीन आहे का? पण काही मूर्ख माणसांमुळे ती दरवेळी यशस्वी होताना दिसते.

या मूर्खपणाचं मूळ नेमकं कुठे आहे? परंपरेला चिकटून बसलेली विचारसरणी, संकुचितपणा, अनेकदा शिक्षणाचा -अनुभवाचा आणि पर्यायाने स्वतंत्र विचारशैलीचा अभाव किंबहुना आळसच आणि आंधळं अनुकरण. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे आपणच बरोबर आणि आपल्यापेक्षा वेगळ्या विचारधारा चूक, हा ठाम समज. अशांचा एखादा माणूस आवडता असतो, म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट योग्य असते आणि नावडता असेल तर त्याची प्रत्येक गोष्ट अयोग्य असते. यांना मतभेद झेपत नाहीत. वास्तविक मतभेद असणं आणि ते व्यक्त करता येणं ही अतिशय निरोगी गोष्ट आहे.

मतभेदांतून होणाऱ्या चच्रेतून एखाद्या प्रश्नावर तोडगा निघत असेल तर सोन्याहून पिवळं! आणि नसेल निघत तरी तो विषय ‘लेट गो’ करण्याचा समंजसपणा खूप काही शिकवतो. ज्यांना मतभेदच झेपत नाहीत ते टीकेला तर सामोरे जाऊच शकत नाहीत. ते सारं वैयक्तिक पातळीवर नेतात. कारण ते सर्वात सोपं असतं. त्यांच्या बुद्धीची झेप तितपतच असते. आणि अशांचा कळप बनतो, तेव्हा त्यांना वेगळाच चेव चढतो. ट्रोिलग करण्यापासून ते पार मुंडकं छाटण्याच्या धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल जाते. ‘पद्मावत’ चित्रपटाचं उदाहरण अगदी ताजं आहे. चित्रपट प्रदíशत होण्याआधीच, त्यात नेमकं काय आहे हे पाहण्याआधीच त्याला विरोध केला गेला. ज्यांचा त्याला विरोध आहे, त्यांनी तो पाहू नये. ज्यांना पाहायचाय ते पाहतील. सरसकट चित्रपटावरच बंदी आणण्याचा दबाव म्हणजे लोकशाहीची चेष्टा आहे. आपल्या मनासारखं व्हावं म्हणून इतरांवर सक्ती करणं, हे चीड आणणारं आहे. यामागे भयंकर असुरक्षितता आहे. लोक खरंच डोळसपणे जगू लागले, सारासार विचार करू लागले, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं अवघड होईल, त्यांना चिथवून त्यांचा वापर करून घेणं मुश्कील होईल, हे या कळपांचे पुढारी चांगलं जाणून आहेत. त्यामुळे नव्या विचारांना, नव्या दृष्टिकोनांना, नव्या कलाकृतींना विरोध करीत प्रसंगी दडपशाहीचा, दहशतीचा वापर करून ते आपला स्वार्थ साधतात. केवळ विचार आणि कलाकृतीच नाही तर माणसाच्या रोजच्या जगण्यातल्या साध्यासोप्या गोष्टींवर उदा. त्याने काय खावं, काय खाऊ नये, कोणावर प्रेम करावं, करू नये, केलं तर कसं करावं, कोणते सण साजरे करावेत, करू नयेत या सगळ्यांबद्दल त्यांचं म्हणणं असतं, आणि त्याला कोणी विरोध केला तर राडेबाजी करायला त्यांचे अंधानुयायी तयारच असतात.

पण हे ज्या धर्माच्या, संस्कृतीच्या, इतिहासाच्या नावाखाली केलं जातं त्यात खरंच डोकावून पाहिलं तर लक्षात येईल, की सगळं झाकून, दाबून ठेवायची आपली संस्कृती नाहीच. वैचारिक स्वातंत्र्याला, प्रयोगशीलतेला खूप महत्त्व आहे. जे जे नसíगक आहे, त्याचा आदर करण्याची वृत्ती आहे. सौंदर्यशास्त्र (अ‍ॅस्थेटिक्स) शोधण्याचा आपला स्वभाव आहे. स्थापत्य, साहित्य, संगीत, विज्ञान, गणित, वैद्यक, शिल्पकला, चित्रकला, प्रत्येक शाखेतलं आपलं योगदान हा त्याचाच पुरावा आहे. पं. रविशंकर त्यांच्या राग-अनुराग नावाच्या आत्मचरित्रात आपल्याकडच्या जीवनपद्धती आणि तत्त्वज्ञानाबद्दल लिहितात, ‘‘जीवनात सौंदर्य कसं आणायचं, हे त्यांना ठाऊक होतं. तसंच त्याचा उपभोग कसा घ्यायचा हेसुद्धा त्यांना ठाऊक होतं. एका बाजूला गीता, वेद, उपनिषद, पूजा-अर्चा, होम-यज्ञ आहेत, तर दुसऱ्या बाजूला खजुराहो-कोणार्कची निर्मिती आहे. कामसूत्र, कुमारसंभव, गीतगोिवद यांचं लेखन आहे. भोग, संभोग आणि त्याग यांच्यामधून त्या युगातल्या ऋषिमुनींनी, कलाकारांनी, अभ्यासकांनी, संगीतज्ञांनी, नर्तकांनी आणि अभिनेत्यांनी किती तरी गोष्टींची निर्मिती केली आहे. खूप उच्च स्तरावर अध्यात्म (स्पिरिच्युअ‍ॅलिटी) आणि विषयासक्ती (सेन्शुअ‍ॅलिटी) यांचं मीलन स्थान आहे, हे त्यांना ठाऊक होतं. मुस्लिमांच्या आगमनानंतर आणि नंतर इंग्रजांच्या अमलात सगळा प्रकार काहीच्या काहीच होऊन गेला. हळूहळू आमचा दृष्टिकोनच बदलून गेला. आक्रमकांच्या प्रभावामुळे आणि भयामुळे आपण मनाची निर्मळता, वसंतोत्सव, जीवन सरळपणे उपभोगण्याची कला विसरू लागलो. आमच्या मनात भय, पाखंडीपणा आणि विवेकाच्या कानपिचक्यांनी प्रवेश केला.’’

आज परकीय आक्रमणांतून आपण मुक्त झालो असलो तरी मनाच्या संकुचितपणातून पूर्णपणे मुक्त झालेलो नाही. आणि त्यामुळेच स्वत:ला हुकूमशहा समजणाऱ्या आजच्या काळातल्या तथाकथित धर्मरक्षक- संस्कृतिरक्षकांचं फावलंय. पण धाकदपटशा दाखवून, जोर-जबरदस्तीने धर्माचं- संस्कृतीचं रक्षण होत नसतं. सारं पुन्हा शांततेच्या मुद्दय़ावर येतं. ‘जगा आणि जगू द्या’ हे आपल्या संस्कृतीचं सार आहे. मनाचा संकुचितपणा मागे टाकून परस्परांना मोकळेपणाने बिलगल्यावरच एकमेकांबद्दल सामंजस्य, प्रेम, विश्वास निर्माण होतो. आणि यातूनच साकार होतं शांततापूर्ण सहअस्तित्व.

आनंदी जोशी – response.lokprabha@expressindia.com / @aanandi_j
सौजन्य – लोकप्रभा