अभिनेत्री रकुलप्रीत सिंहसह धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माते क्षितिज रवी प्रसाद यांची अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी चौकशी केली. रकुलप्रीतने रियाशी अमली पदार्थाबाबत सवांद साधल्याची कबुली या वेळी दिली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान रकुलचे नाव घेतले होते. या दोघींनी अमली पदार्थाबाबत चर्चा केल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले होते. या प्रकरणी रियाला अटक केल्यानंतर तिने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी एनसीबीने रकुलला चौकशीसाठी बोलावले.

शुक्रवारी कुलाबा येथील विश्रामगृहात एनसीबीच्या विशेष तपास पथकाने रकुलची चार तास चौकशी केली. रियासोबत अमली पदार्थाबाबत चर्चा केल्याचे रकुलने मान्य केले. मात्र अमली पदार्थाचे सेवन कधीच केलेले नाही, असा दावाही तिने केला.

सुशांतचा मृत्यू गळा आवळल्याने?

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील एका डॉक्टरच्या हवाल्याने केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरची छायाचित्रे या डॉक्टरला पाठवण्यात आली होती, त्यावरून गळा आवळल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. ‘केंद्रीय अन्वेषण विभाग चौकशीत दिरंगाई करीत असल्याने आपण निराश झालो आहोत’, असेही विकास सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे.