10 July 2020

News Flash

‘भयपटाबाबतच्या मानसिकतेमध्ये बदल’

 ‘भूत द हाँटेड शिप’ या चित्रपटाकडून विकीला खूप आशा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणारा अभिनेता विकी कौशल हा आजघडीला हिंदी चित्रपटसृष्टीतील लंबी रेस का घोडा मानला जातो. चित्रपटांची जाणीवपूर्वक निवड, सहजसुंदर अभिनय, आणि लोकप्रिय असतानाही वास्तवाची असलेली जाणीव त्याला इतर अभिनेत्यापेक्षा वेगळ्या ठरवतात. ‘भूत द हाँटेड शिप’ या चित्रपटाच्या निमित्ताने विकी पहिल्यांदाच भयपटातून पडद्यावर येणार आहे. या निमित्ताने प्रेमकथेत हातखंडा असलेल्या करण जोहरची ‘धर्मा’ प्रॉडक्शनही प्रथमच भयपटाची निर्मिती करत आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्याशी साधलेला संवाद..

‘भूत द हाँटेड शिप’ या चित्रपटाकडून विकीला खूप आशा आहे. या चित्रपटामुळे भारतीय प्रेक्षकांच्या भयपटाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होईल असे त्याला वाटते. कारण आतापर्यंत भयपट हा चेष्टेचा विषय झाला होता, परंतु या चित्रपटात निव्वळ भयकथा असल्याने प्रेक्षकांची दृष्टी बदलेल असेही मत विकी व्यक्त करतो. या वेळेस चित्रीकरण करताना झालेल्या अपघाताचा किस्सा त्याने सांगितला. एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये अलंग येथील जहाजावर एक दृष्य चित्रित करताना चेहऱ्याला दरवाजाची कडी लागली होती. दृश्य सुरू असताना कडी लागल्याने माझ्यासोबतच्या सहकलाकारांना वाटले की मी अभिनय करतो आहे. चेहऱ्यावरील रक्त पाहिल्यावर मग त्यांनी डॉक्टरांना बोलावले. सुदैवाने उत्कृष्ट डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले. गालाला हेयरलाइन फॅ्रक्चर असल्याने एकूण १३ टाके घालण्यात आले. जास्त वेदना होत होत्या. तशाच परिस्थितीत पुढचे सलग दहा दिवस उरलेल्या दृश्यांचे चित्रीकरण केल्याचे विकीने सांगितले. याचे चित्रीकरण संपल्यावर लगेच मला ‘उधमसिंग’चे चित्रीकरण करण्यासाठी रशियात जायचे होते. गुजरातमध्ये घातलेले चेहऱ्यावरील टाके मी रशियात काढले. उधमसिंगचे पोस्टर पाहिल्यास त्याच्या चेहऱ्यावर डाग असल्याचे लक्षात येईल. ते खरे असून आता जखम बरी झाल्याने मेकअपच्या साहाय्याने तो डाग लपवला जातो, असे त्याने सांगितले.

यावेळेस विकीने लहानपणीची भुताची एक आठवण सांगितली. पंजाबमध्ये आमचे गाव आहे. गावातील घराशेजारी पिंपळाचे एक झाड होते. लहान असताना वडीलधारी माणसं भुताखेतांच्या गोष्टी सांगून घाबरवायचे. त्यामुळे रात्री तेथे जाण्यास भीती वाटायची. मित्रांकडून रात्री अशा अनेक कथा ऐकल्या असल्याचेही तो सांगतो.  त्याने राझ, कोँज्युरिंग आणि अ‍ॅनाबेला यासारखे चित्रपट पाहिले आहेत. मात्र हे चित्रपट एकटय़ाने पाहताना भीती वाटत असल्याची प्रांजळ कबुली विकीने दिली. ‘धर्मा’कडून जेव्हा या चित्रपटासाठी विचारण्यात आले तेव्हा यासाठी मनाने तयार नव्हतो. कारण हा भयपट, रहस्यकथेचा प्रांत माझ्यासाठी नवीन होता आणि याआधी आलेल्या चित्रपटात भयकथेपेक्षा गाणी प्रेमाची कथा, मारामारी, विनोद जास्त असल्याने यातही अशाच गोष्टी असेल अशी अटकळ मी बांधली होती. मात्र, कथा वाचल्यावर ती खरोखरच भयकथा आहे हे लक्षात आलं. शिवाय, त्यासाठी बरीचशी दृश्ये पाण्यात चित्रित करावी लागणार होती. मला पाण्याची लहानपणापासून भीती वाटते, त्यामुळे त्याचाही सामना करायचा होता. पण या चित्रपटामुळे पाण्याविषयी असणारी भीती दूर झाली, असे तो म्हणतो.

विकीचा भाऊ सनी कौशलही वैशिष्टय़पूर्ण चित्रपटाची निवड आणि कसदार अभिनयासाठी ओळखला जातो. हे दोन्ही भाऊ एकाच वेळी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. भावामुळे आपल्याला चुरशीची स्पर्धा मिळत असल्याचे तो नमूद करतो. सनी हा माझ्यापेक्षा चांगला अभिनेता आहे. आम्ही दोघांनी कारकीर्दीची सुरुवात एकत्रच केली होती. तो माझ्यापेक्षा एक वर्षांने लहान आहे. मला आठवते की, बंद खोलीत एकत्र ऑडिशनसाठी आम्ही व्हिडीओ शूटही केले आहेत. तसेच एकमेकांना मदतही केली आहे. माझ्याकडे असणाऱ्या भूमिकांविषयी त्याला सांगत होतो. तर तो त्याच्याकडे येणाऱ्या कामांसाठी माझे नाव सुचवायचा. आम्ही दोघेही आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टींचे साक्षीदार आहोत. त्यामुळे त्याच्या अभिनयाची दखल घेत त्याला चांगली कामे मिळत असल्याचा मला अभिमान आहे, असे विकी म्हणतो. आमचे वडील श्याम कौशल हे गेली कित्येक वर्ष स्टंट डायरेक्टर म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहेत, मात्र त्यांच्या नावाने कधीही काम मिळाले नाही. मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर मी आणि सनी या चित्रपटसृष्टीत आलो. पहिले नाटक, नंतर छोटय़ा भूमिका, चित्रपट असे एकेक टप्पे पार करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. अजून लांबचा पल्ला गाठायचा असल्याचे विकी कौशल सांगतो. रामसे बंधू, रामगोपाल वर्मा आणि आता महेश भट्ट हे भयपटातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मानले जातात. ‘भूत द हाँटेड शिप’ या चित्रपटाच्या वेगळेपणाविषयी सांगताना, ‘‘आतापर्यंत भयपट घरात, हॉटेलमध्ये चित्रित झाले आहेत, परंतु या चित्रपटाची कथा एका जहाजावर घडते. २०११ मध्ये मुंबईच्या किनाऱ्यावर विस्डम नावाचे जहाज आले होते. या जहाजावरील भयावह दृश्यांची कल्पना करून हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा बराचसा भाग कंटेनर जहाजात चित्रित झाला आहे. या जहाजाचे वैशिष्टय़ असे की यात चार मजले आणि तीनशे खोल्या असतात. यात एक माणूस हरवल्यावर तो त्या परिस्थितीला कसे सामोरे जाईल हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक असेल, असे तो म्हणतो. या चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच येणार आहे. हॉलीवूडमध्ये ‘अ‍ॅनाबेला’, ‘द काँज्युरिंग’ या चित्रपटाचे सिक्वल्स आले आहेत आणि जगभरातील प्रेक्षकही आवडीने पाहतात. मात्र भारतात भयपटांचे पुढे भाग होत नाहीत. कारण या चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळणारा अल्प प्रतिसाद. याचे कारण सांगताना विकी पुढे म्हणतो की, बॉलीवूडमध्ये तयार होणाऱ्या भयपटात गाणी, प्रेमकथा, अ‍ॅक्शन जास्त असल्याने रहस्यकथांची मजा जाते. परदेशी चित्रपटात निव्वळ भयकथाच मांडण्यात आल्याने ते जगभरात यशस्वी होतात. ही बाब लक्षात घेऊन या चित्रपटात केवळ भयकथाच दाखवण्यात आली असल्याने प्रेक्षकांना तो आवडेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

‘भूत द हाँटेड शिप’ या चित्रपटाचा बराचसा भाग कंटेनर जहाजात चित्रित झाला आहे. या जहाजाचे वैशिष्टय़ असे की यात चार मजले आणि तीनशे खोल्या असतात. यात एक माणूस हरवल्यावर तो त्या परिस्थितीला कसे सामोरे जाईल हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक असेल. चित्रपटात केवळ भयकथाच दाखवण्यात आली असल्याने प्रेक्षकांना तो आवडेल.

– विकी कौशल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 4:46 am

Web Title: interaction with vicky kaushal on film bhoot the haunted ship abn 97
Next Stories
1 ऑस्कर फॅशनची न्यारी तऱ्हा!
2 नाट्यरंग : बारोमास अस्वस्थानुभव!
3 ‘बदलती नाती विशद व्हायला हवीत’
Just Now!
X