राष्ट्रीय पुरस्कार विजेते उज्ज्वल चॅटर्जी हे रविंद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. याची निर्मिती अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या कंपनीकडून करण्यात येत असून तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रविंद्रनाथ टागोर आणि त्यांची इंग्रजी शिक्षिका अन्नपूर्णा तुरखुड यांच्यातील नातेसंबंधावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातील इंटिमेट सीन काढण्याचा निर्णय दिग्दर्शकांनी घेतलाय.
‘विश्व भारती विद्यापीठाच्या शिफारशीनुसार इंटिमेट सीन काढून टाकण्यात येणार आहेत. यातील एक दृष्य मी काढून टाकणार आहे. संशोधनातील सत्यता तपासण्यासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीच्या निर्णयांबाबत मला कोणतीही अडचण नाही. नोव्हेंबरमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होणार असून शांतीनिकेतन, जोरासांको आणि महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यात येईल,’ असे उज्ज्वल चॅटर्जी म्हणाले.
आत्माराम पांडुरंग तुरखुड यांची मुलगी अन्नपूर्णा तुरखुड या अन्ना किंवा अन्नाबाईच्या नावानेही ओळखल्या जायच्या. १८७८ मध्ये ब्रिटनला जाण्यापूर्वी टागोर त्यांच्याच घरी राहून इंग्रजी बोलण्याचे धडे शिकायचे. टागोर अन्नपूर्णा यांना नलिनी म्हणून संबोधित करायचे आणि नंतर याच नावाने अन्नपूर्णा लिहायचे. वृद्धापकाळातसुद्धा टागोर अन्नपूर्णा यांची आठवण काढायचे.
वाचा : ‘इंदू सरकार’च्या अडचणीत वाढ, काँग्रेसकडून तीव्र विरोध
रविंद्रनाथ टागोर आणि अन्नपूर्णा यांच्यामधील भावनिक नातेसंबंधाचे चित्रण या चित्रपटातून करण्याचा प्रयत्न चॅटर्जी करणार आहेत. हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळणे आवश्यक असल्याचे विश्व भारती विद्यापीठचे कुलगुरू स्वपन कुमार दत्ता यांनी म्हटले. मराठी, बंगाली आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.