सोशल मीडिया हाताळताना बऱ्याच गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते, अन्यथा त्याचा मोठा फटका बसण्यास वेळ लागत नाही. सोशल मीडियावर पोस्ट करताना केलेल्या एका चुकीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशीच एक चूक प्रसिद्ध मासिकाने केली आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार इरफान खानला मिळाला. मात्र, ‘फेमिना’ मासिकाने या पुरस्काराचे श्रेय इरफान खानऐवजी क्रिकेटर इरफान पठाणला दिले.

मासिकाने ट्विटरवरून शुभेच्छा देताना इरफान पठाणला टॅग केले. हजरजबाबीपणासाठी ओळखला जाणाऱ्या इरफान पठाणनेही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. ‘धन्यवाद आणि माफ करा मी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावू शकलो नाही, पण तुम्ही तो पुरस्कार माझ्या घरी पाठवू शकता,’ असे उत्तर इरफानने ट्विटरवर दिले. त्याच्या या उत्तरावर ट्विटर युजर्सनाही हसू अनावर झाले. इरफान पठाणच्या विनोदबुद्धीची नेटकऱ्यांनीही प्रशंसा केली.

वाचा : तुझ्यासारखा तूच; रणवीरच्या अतरंगी कपड्यांवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या हजरजबाबीपणासाठी तुला नक्कीच पुरस्कार मिळाला पाहिजे, असे ट्विट एका युजरने केले. तर एकाने चक्क इरफान खानला टॅग करत लिहिले की, तुमचा पुरस्कार दुसऱ्यांना दिला जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घेतली नाही तर कशाप्रकारे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, हे याचे उत्तम उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही.