अभिनेता इरफान खानच्या ट्विटनंतर त्याच्या प्रकृतीविषयी जोरदार चर्चा होऊ लागल्या. मी एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून तुमच्या प्रार्थनांची मला गरज आहे, असं ट्विट त्याने सोमवारी केलं होतं. तेव्हापासूनच त्याच्या आजारपणाबद्दल कलाविश्वात आणि सोशल मीडियावर चर्चा होऊ लागल्या. इरफानला ब्रेन कॅन्सर झाला असून त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केल्याचे बरेच मेसेज गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. पण या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘इरफान खान उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झालेला नाही,’ असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मला दुर्धर आजार असून डॉक्टरांकडून सखोल रिपोर्ट येईपर्यंत मी त्याबद्दल अधिक काही सांगू शकत नाही, असे इरफानने ट्विटमध्ये म्हटले होते. त्याचप्रमाणे या आजारावर उपचार सुरु असल्याचेही त्याने कळवले होते. त्याचप्रमाणे माझ्या प्रकृतीबाबत कोणत्याही अफवा पसरवू नका. या आजाराच्या निष्कर्षापर्यंत जेव्हा डॉक्टर पोहोचतील, तेव्हा पुढील १० दिवसांत मी स्वत:च याबाबत पूर्ण माहिती देईन, असं आवाहानदेखील चाहत्यांना त्याने केलं होतं.

वाचा : महिला दिनानिमित्त थिएटरमध्ये चमकणार बॉलिवूडची ‘चांदनी’

आजारी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो शूटिंग पुढे ढकलत असल्याची माहिती दिग्दर्शक विशाल भारद्वाजने काही दिवसांपूर्वी दिली होती. तर इरफानला कावीळ झाल्याचे त्याच्या प्रवक्त्याने २१ फेब्रुवारी रोजी प्रसारमाध्यमांना कळवलं होतं. त्यामुळे इरफानला नेमका कोणता आजार झाला आहे, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

वाचा : ‘त्या’ चाहतीने सर्व संपत्ती केली संजय दत्तच्या नावे 

चित्रपटसृष्टीतील तीन दशकांच्या करिअरमध्ये इरफानने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘पान सिंह तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘पिकू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे.