‘अमेझिंग स्पायडर मॅन’, ‘ज्युरासिक वर्ल्ड’ आणि आता ‘इन्फेर्नो’ अशा विविध हॉलीवूडपटांमधून काम करणाऱ्या इरफान खानने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अभिनेता म्हणून हॉलीवूडमध्येही नावलौकिक कमावणारा इरफान आता एका आंतरराष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

‘इन्फेर्नो’चे चित्रीकरण पूर्ण करणाऱ्या इरफान खानने ‘नो बेड ऑफ रोसेज’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट साइन केला आहे. मुस्तफा सरवर फारुकी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही फारुकी यांचे असून इरफान या चित्रपटात अभिनेता आणि सहनिर्माता अशी दुहेरी जबाबदारी पेलणार आहे. ‘चांगल्या कथा मला नेहमीच आकर्षित करतात. मुस्तफा यांनी या चित्रपटासाठी ज्या पद्धतीने मला विचारणा केली त्यांची पद्धत, त्यांचे विचार मला आवडले. शिवाय, त्यांनी मला चित्रपटासाठी विचारणा केली तेव्हाच मी त्यांचा ‘एट स्टोरी’ हा चित्रपट पाहिला होता. त्यामुळे ‘नो बेड ऑफ रोसेज’ हा चित्रपट कलाकार म्हणून मी स्वीकारला. त्याचबरोबर सहनिर्माता म्हणून चित्रपटाशी जोडले जाणे महत्त्वाचे वाटले’, असे इरफान खानने सांगितले.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मार्च महिन्याच्या शेवटी सुरुवात होणार असून चित्रपटाचा ३५ टक्के भाग बांगलादेश आणि उत्तर बंगाल परिसरात चित्रित होणार आहे. इरफान त्याच्या ‘आयके’ बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. इरफानचे या चित्रपटाशी निर्माता म्हणून जोडले जाणे खूप महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत दिग्दर्शक मुस्तफा सरवर फारुकी यांनी आपला आनंद व्यक्त केला.