शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या पदार्पणातील चित्रपट ‘इश्क विश्क’ बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजलेला. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तरुणाईला आवडणारा विषय आणि विषयाला साजेसे कलाकारही होते. याच चित्रपटातून शाहिदची ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख तयार झाली. प्रदर्शनाच्या तब्बल ११ वर्षांनंतर म्हणजेच २०१४ मध्ये निर्मात्यांनी त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता या सिक्वलच्या मार्गातही बरेच अडथळे येत असून ‘रेस ३’ चित्रपटानंतर हा मार्ग मोकळा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

जेव्हा २०१४ मध्ये सिक्वलचा निर्णय झाला, त्यावेळी शाहिद आणि प्रियांका चोप्रा यांना मुख्य भूमिकेत घेण्याचा विचार करत केन घोषला दिग्दर्शनासाठी विचारण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव केनने नंतर याचे दिग्दर्शन करण्यास नकार दिला. अखेर २०१६ मध्ये पुन्हा एकदा सिक्वलच्या शूटिंगचे काम सुरु करण्यात आले. यावेळी ‘इश्क विश्क’चा सिनेमॅटोग्राफर अॅमी रॉय सिक्वलचे दिग्दर्शन करत असल्याची माहिती समोर आली. त्याचप्रमाणे, अभिनेता गिरीष कुमारची चुलत बहीण रवीनासुद्धा यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर मुख्य अभिनेता कोण असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाचा : यापुढे ऐतिहासिक भूमिका नको रे बाबा!- दीपिका पदुकोण

अभिनेत्रीचा चेहरा जरी नवीन असला तरी निर्मात्यांना अभिनेता मात्र नावाजलेला चेहरा हवा आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या माहितीनुसार ठरल्यापेक्षा चित्रपटाचा बजेट वाढत असून त्याचा परिणाम शूटिंगवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे निर्माते रमेश तौरानी सध्या ‘रेस ३’ चित्रपटावर लक्ष केंद्रित करत असल्याने त्यानंतरच ‘इश्क विश्क २’ची गाडी पुढे सरकू शकेल अशी शक्यता आहे.