अडीच दशकांपासूनची मैत्री तुटते आणि त्या मागचे कारणही जेव्हा स्पष्ट होत नाही तेव्हा त्या नात्यात अधिक वाद होऊन नातं अजून कडवट बनत जातं. असेच काहीसे सध्या करण जोहर आणि काजोलमध्ये झाले आहे. त्यांच्यातले हेच वाद अजून वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
करण जोहरच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेल्या चरित्रामध्ये स्पष्ट झाले की काजोल आणि त्याची २५ वर्षांची मैत्री ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच तुटली. पण या मागे नक्की काय कारण आहे ते मात्र त्याने सांगितले नाही. गेल्या वर्षी अजय आणि करण यांच्यात भडकलेली वादाची आग अजूनपर्यंत शांतही होत नाही तोवर करणने परत यात तेल ओतले असेच म्हणावे लागेल. एका इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या वृत्तात असे म्हटले आहे की अजय देवगणने या प्रकरणात समोर यायचे ठरवले आहे.
करण फक्त आपल्या पुस्तकाचा खप वाढण्यासाठी या सर्व गोष्टी बोलत आहे. तो नेहमीच लोकांच्या मागे बोलतो. दोन वर्षांपूर्वी जेव्हा करण जोहरने एका पार्टीमध्ये प्रियांका चोप्राबद्दल वाईट गोष्टी बोलल्या होत्या तेव्हा शाहरुख खानही त्याच्यावर भडकला होता असे एका इंग्रजी वृत्तपत्राने अजयच्या निकटवर्तीयांचा हवाला देत म्हटले होते.
या वृत्तपत्राने असाही दावा केला की जेव्हा करणने काजोलबद्दल वक्तव्य केले तेव्हा अजयला फार राग आला आणि त्याने करणला फोन करत म्हटले की, ‘तुला सिनेमाबद्दल जे काही बोलायचे असेल ते तो बोलू शकतो पण त्याच्या बायकोबद्दल आणि परिवाराबद्दल त्याने काहीही बोलू नये.’ या संदर्भात अजयने शुक्रवारी एक ट्विटही केले. या ट्विटमध्ये त्याने म्हटले की, कृपया जुन्या मुलाखती छापणे बंद करा. कारण प्रत्येक मुलाखतीत दिलेले उत्तर हे वेळेनुसार बदलत जाते. पण अजयच्या या ट्विटचा संदर्भ करण जोहरशी होता की नाही हे मात्र त्याने स्पष्ट केले नाही.
Request:- pls stop printing old interviews. Answers are dependent on time remember ?
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 13, 2017
‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ अशा विविध सिनेमांच्या माध्यमातून काजोलने करणसोबत काम केले आहे. शिवाय त्यांच्या मैत्रीचे किस्सेही सर्वांनाच माहीत आहेत. कोणत्याही सिनेमाच्या निर्मितीवेळी काजोल ही करणची पहिली पसंती असायची. पण, सध्या मात्र या दोघांच्या मैत्रीला गालबोट लागल्याचे दिसते. मैत्रीचा वापर करणने आपल्या पुस्तकाला खप मिळवून दिल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. या वृत्ताला करण किंवा अजय आणि काजोल यांच्यापैकी कोणीच दुजोरा दिलेला नाही.