अभिनेता जावेद जाफरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून योगगुरु रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीची काही दिवसापूर्वी खिल्ली उडविली होती. जावेदचं हे ट्विट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. अनेकांनी त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे.

काही दिवसापूर्वी जावेदने त्याच्या मित्राने फॉरवर्ड केलेला मेसेज ट्विटरवर शेअर केला होता. या मेसेजमध्ये पतंजली मीठाची खिल्ली उडविण्यात आली होती. मात्र त्याचं हे ट्विट पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

“विनोदी अभिनेता जावेद जाफरी यांनी खाद्य पदार्थांच्या पाकिटावरील माहिती नीट वाचली पाहिजे”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर “खाद्य पदार्थांच्या पाकिटावरील माहिती नीट न वाचताच हा मेसेज फॉरवर्ड केला आहे. जर तुमच्याकडे एवढा वेळ असेल तर केंद्रीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) संकेतस्थळाला नक्की भेट द्या आणि त्यानंतरच वस्तूच्या वापराविषयी बोला”, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, या साऱ्यावर जावेदने देखील ट्रोलकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. “विनोद आणि व्यंग्य यांच्या अपुऱ्या माहितीच्या आधारे तुम्ही ट्विट करत आहात, जर तुमच्याकडेदेखील वेळ असेल तर कृपा करुन एकदा जोक्सचे संकेतस्थळांना भेट द्या, तेव्हा तुम्हा जोक, विनोद म्हणजे नक्की काय असतो ते समजेल”, असं जावेद म्हणाला आहे.