करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटाचा सामना देशातील प्रत्येक नागरिकाला करावा लागत आहे. याकाळात लॉकडाउन घोषित केल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटाची झळ कलाविश्वातील रोजंदारीवर काम करणाऱ्यांनादेखील बसली आहे.त्यामुळे अनेक कलाकार या गरजुंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यातच अभिनेता निर्माता जॅकी भगनानीनेदेखील ६०० बॅकग्राऊंड डान्सरसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

जॅकी भगनानीने ऑल इंडिया फिल्म टेलिव्हिजन अॅण्ड इव्हेंट्स डान्सर्स असोसिएशनच्या ६०० डान्सरला मदत केली आहे. त्याने या सहाशे जणांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या सामानचं वाटप केलं आहे. गेल्या ४ महिन्यांपासून कलाविश्वातील कामकाज ठप्प झालं आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणूनच, जॅकीने या गरजुंमध्ये अन्नधान्य आणि अन्य वस्तूंचं वाटप केलं आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील जॅकीने बीएमसी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी १ हजार पीपीई किट पुरविले होते. तसंच जेजस्ट म्युझिकअंतर्गत मुस्कुराएगा इंडियाच्या माध्यमातून विविध मदतनिधीच्या माध्यमातून ३ कोटींची मदत केली आहे. त्यामुळे सध्या जॅकीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.