देशभरामध्ये करोना विषाणूने थैमान घातलं आहे. त्यामुळे गेल्या अडीच- तीन महिन्यांपासून लॉकडाउन सुरु आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून अनेक जण विविध मार्गाने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कलाविश्वातील काही आघाडीच्या कलाकारांचाही समावेश आहे. अलिकडेच बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफने अशा गरजुंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याला जॅकी श्रॉफ यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी अ.भा.म. चित्रपट महामंडळाच्या चैत्राली डोंगरे यांच्याकडे काही जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या.

“सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अशावेळी एकमेकांना मदत करणे, मानसिक आधार देणे खूप गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीतील सगळ्यांना सध्या या कठीण प्रसंगातून जावं लागत आहे. मात्र पडद्यामागील तंत्रज्ञ वर्गाला सगळ्यात जास्त झळ लागली आहे. त्यामुळे मला शक्य होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न मी करतोय”, असं जॅकी श्रॉफ म्हणाला.

दरम्यान, जॅकी श्रॉफने केलेल्या मदतीमुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आभार व्यक्त केले आहेत.यापूर्वी रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, माधुरी दिक्षित या कलाकारांनीही मदत केली आहे.