अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाही, मक्तेदारी आणि ग्रुपिझम यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. अनेक कलाकारांनी त्यांना घराणेशाही किंवा ग्रुपिझमचा अनुभव आल्याचं म्हटलं आहे. यावादात आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने उडी घेतली असून तिचं मत मांडलं आहे. अद्यापही मला घराणेशाहीचा अनुभ आला नाही असं म्हणत जॅकलीनने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
एका मुलाखतीत असताना जॅकलीनने कलाविश्वातील घराणेशाही आणि अन्य काही मुद्द्यांवर चर्चा केली. यात मला अद्यापतरी घराणेशाहीचा अनुभव आला नाही. मला काम मिळतंय असं म्हटलं आहे.
“जगातील सगळ्यात सुंदर फसवणूक म्हणजे कलाविश्व आहे. गेल्या १० वर्षांपासून मी इथे आहे. इथे आम्ही जे करतो ते खरं नसतं. एक कालाकार म्हणून आम्ही जे काम करतो तो फक्त एक दिखावा असतो. या क्षेत्रात आल्यावर मी एक गोष्ट शिकले, तुम्ही प्रतिभावंत कलाकार होऊ शकता, प्रचंड मेहनत करणारे कलाकार होऊ शकता. परंतु, याच काळात कलाविश्वाला अशाही एका कलाकाराची गरज असते जो प्रेक्षकांचा लाडका, आवडता असतो”, असं जॅकलीन म्हणाली.
“पुढे ती म्हणते, कलाविश्वात प्रेक्षकांच्या पसंतीला तितकंच महत्त्व आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने तुम्हाला कळतं की तुमचं प्रेक्षकांसोबतचं नातं कसं आहे. त्यामुळे चित्रपट करताना केवळ कलाकारांचा नाही तर असंख्य प्रेक्षकांचा विचार करावा लागतो. ते एक टीम वर्क आहे. त्यामुळे या सगळ्यांसोबत काम करताना तुम्हाला त्या पात्रतेचं होणं गरजेचं आहे. मला कधीच या क्षेत्रात घराणेशाहीचा अनुभव आला नाही, कारण मला काम मिळत गेलं. मात्र मला ज्या कामाची अपेक्षा आहे. तसं काम मला अद्यापतरी मिळालेलं नाही. परंतु, मला कामाची गरज आहे. त्यामुळे अजूनतरी मला बऱ्यापैकी कामं मिळत आहेत”.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालं नाही. परंतु, बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.