मोहनदास करमचंद अर्थात महात्मा गांधी यांच्या संपूर्ण राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातही त्यांची पत्नी कस्तुरबा यांचे मोठे योगदान आहे. कस्तुरबा यांच्या जीवनावर आधारित ‘जगदंबा’ हे नाटक आता इंग्रजीतून सादर होणार आहे.
ज्येष्ठ प्रकाशक आणि लेखक रामदास भटकळ यांनी ‘जगदंबा’ या नाटकात कस्तुरबा यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा दृष्टिकोन, विचार उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जगदंबा’ हे दोन अंकी मूळ नाटक मराठीत असून काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी नाटकाचे प्रयोग केले होते.
कस्तुरबा यांचे विचार, त्यांचे जीवन अन्य भाषक तसेच जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी आता हे नाटक इंग्रजीतून सादर केले जाणार आहे.
यशोधरा देशपांडे-मैत्र यांनी हे नाटक इंग्रजीत अनुवादित केले असून त्या या नाटकात ‘कस्तुरबा’ साकारत आहेत. ‘जगदंबा’ या इंग्रजी नाटकाचा प्रयोग नुकताच मणीभवन येथे सादर झाला.  नाटकाचे लेखक रामदास भटकळ यांनी सुरुवातीला या नाटकाबद्दलची आपली भूमिका मांडली.