बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदवीर जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद यांचं वृद्धापकाळानं बुधवारी मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. जगदीप यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये ते ‘शोले’ चित्रपटातील आपला प्रसिद्ध डायलॉग उच्चारताना दिसत आहेत.
बॉलिवूड न्यूज या इन्स्टाग्राम फॅन पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “आओ हंसते-हंसते, जाओ हंसते-हंसते. हमारा नाम भी सूरमा भोपाली ऐसे ही नहीं है. अब आप समझ लो.” असा गंमतीशीर डॉयलॉग जगदीप यांनी या व्हिडीओमध्ये उच्चारला आहे. त्यांचा हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्यप्रदेशातील दतिया या जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचं खरं नाव होतं. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’ या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरूवात केली. ‘अब दिल्ली दूर नही’, ‘मुन्ना’, ‘हम पंछी डाल के’ हे बालकलाकार म्हणून त्यांनी साकारलेले चित्रपटही गाजले होते. त्यानंतर त्यांनी बिमल रॉय यांच्या चित्रपटापासून विनोदी भूमिका साकारण्यास सुरूवात केली. गेली अनेक वर्षे ते बॉलिवूडमध्ये कार्यरत होते. तसंच त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 11:24 am