मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड प्रस्थापित करणाऱ्या ‘सैराट’ या चित्रपटाविषयी काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून एका अशा विषयाला हात घालण्यात आला होता, ज्याच्या माध्यमातून समाजातील दाहक वास्तवही प्रेक्षकांना पाहता आलं. जातव्यवस्थेपासून इतरही बरेच मुद्दे मंजुळेंनी या चित्रपटातून मांडले. त्यासोबतच रिंकू राजगुरु (आर्ची) आणि आकाश ठोसर (परश्या) या दोघांच्या अभिनयाच्या माध्यमातून एक संवेदनशील कथानक साकारण्यात ते यशस्वी ठरले होते.

‘सैराट’ला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि या चित्रपटाचं एकंदर कथानक, त्याच्या वाट्याला आलेलं यश पाहता विविध भाषांमध्येही त्याविषयीची दखल घेतली गेल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला ‘सैराट’चा हिंदी रिमेक म्हणजे शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. पण, मुळात हा चित्रपट ‘सैराट’चा पहिलाच रिमेक आहे असं नाही. ‘धडक’ आणि ‘सैराट’मध्ये होणारी तुलना पाहता या दोन्ही चित्रपटांच्या कथानकातही काही फरक असल्याचं कळत आहे.

इथे चर्चेचा विषय हा आहे, की मुळात ‘धडक’ हा ‘सैराट’चा पहिलावहिला रिमेक नाही. यापूर्वी पंजाबी, कन्नड आणि ओडिया या भाषांमध्येही ‘सैराट’च्या कथानकाशी मिळतेजुळते चित्रपट साकारण्यात आले आहेत.

पंजाबी चित्रपटसृष्टीत ‘चन्ना मेरेया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पंकज बत्रा दिग्दर्शित या ‘चन्ना मेरेया’मधून निंजा, पायल राजपूत, योगराज सिंग आणि अमृत मान झळकले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं कथानक जवळपास ‘सैराट’शीच मेळ खात असल्याचं स्पष्ट झालं. परिणामी चित्रपटाच्या वाट्याला अपेक्षित यश आलं नाही.

कन्नडमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मनसू मल्लिगे’ या चित्रपटाचीही बऱ्यापैकी चर्चा होती. खुद्द रिंकू राजगुरुनेच यामध्ये ‘आर्ची’ची भूमिका पुन्हा एकदा साकारली होती. एस. नारायण दिग्दर्शित ‘सैराट’च्या या रिमेकमध्ये अजय- अतुल यांचं संगीतही होतं. त्यामुळे काही बाबतीत ‘मनसू मल्लिगे’ प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरला होता.

ओडिया भाषेत प्रदर्शित झालेला ‘लैला ओ लैला’ हा चित्रपटसुद्धा ‘सैराट’चाच रिमेक असल्याचं म्हटलं जातं. स्वराज आणि सन्मीरा या चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. इतकच नव्हे, तर बंगाली भाषेत प्रदर्शित झालेला ‘नूरजहाँ’ हा चित्रपटही ‘सैराट’चाच रिमेक असल्याचं म्हटलं जातं.

Bigg Boss Marathi : मेघा, पुष्कर की सई; कोण ठरणार विजेता?

कितीही रिमेक साकारण्यात आले असले, चित्रपटाच्या कथानकाची मांडणी करताना कलाकारांनी त्यांचा दर्जेदार अभिनय सादर केला असला तरीही नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ पुन्हा होणे नाही, असंच रसिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ‘आर्ची- परश्या’च्या मुख्य भूमिका साकारणाऱ्या रिंकू आणि आकाशचीही जादू आजही कायम आहे, असं म्हणायला हरकत नाही.