राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून तोडफोड केली. समर्थकांनी केलेल्या या भयंकर हिंसाचारानंतर ट्रम्प यांच्यावर सर्व स्तरांमधून टीकास्त्र डागण्यात येत आहे. यामध्येच आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

“डोनाल्ड ट्रम्प हे असभ्यतेची कोणतीही पायरी सोडत नाहीत हे यावरुन दिसून येतं. ते किती खुज्या मनोवृत्तीचे आहे हे वारंवार ते त्यांच्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला हे स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना यासाठी १०० पैकी १०० गुण दिले पाहिजेत,” असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं आहे.

वाचा : ‘तुम्ही राष्ट्रवादी असाल तर… ‘; पोलीस चौकशीनंतर कंगनाचं ट्विट

नेमकं काय आहे प्रकरण?

जगातील सगळ्यात जुनी लोकशाही म्हणून अमेरिकेच्या लोकशाहीकडे पाहिलं जातं. मात्र, बुधवारचा दिवस या लोकशाहीसाठी काळा दिवस ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे अमेरिकेची सूत्र जाणार असल्याचं स्पष्ट होताच ट्रम्प समर्थकांनी अमेरिकी संसदेवर हल्ला चढवला. त्यांनी कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला.