बॉलिवूड असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट, या दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये नवोदित अभिनेत्रींचं हटके आणि दणक्यात स्वागत केलं जातं. त्यांच्यासाठी खास हिरोइन इंट्रोडक्शन सॉगची निर्मिती केली जाते. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर एकाही नवोदित अभिनेत्रीचं अशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं नव्हतं. मात्र पहिल्यांदाच अभिनेत्री दिप्ती सती या नवोदित अभिनेत्रीचं स्वागत झालं आहे. तिच्यासाठी लकी चित्रपटात खास इंट्रोडक्शन सॉगची निर्मिती करण्यात आली.

चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी ‘लकी’ या चित्रपटातून दिप्ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे चाहत्यांसोबत तिची हटके पद्धतीने ओळख करुन देण्यासाठी इंट्रोडक्शन सॉग करण्यात आलं. जी ले जरा या गाण्यातून दिप्तीची ओळख करुन देण्यात आली आहे.

संजय जाधव कायमच त्यांच्या चित्रपटामध्ये काही तरी नवीन आणि हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या लकी चित्रपटातही त्यांनी असाच प्रयोग केला केला. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. दिप्तीवर चित्रीत करण्यात आलेलं जी ले जरा हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून यो ( सचिन पाठक) यांनी ते शब्दबद्ध केलं आहे.तर शाल्मली खोलगडेने त्याला स्वरसाज चढविला आहे.

दरम्यान, या गाण्याचं चित्रीकरण मुंबईतील कालाघोडा, सीएसटी स्टेशन, चर्चगेट स्टेशन, मुंबई युनिव्हर्सिटी, सोफिया कॉलेज अशा भागांमध्ये झालं आहे. दिप्ती सतीसोबत या गाण्यात सुमारे ५० डान्सर्स सहभागी झाले आहेत.