अभिनेत्री जिया खान हिच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याची याचिका गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. जियाची आई राबिया खान यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. जिया खान हिने आत्महत्या केली नसून तिच्या प्रियकराने तिची हत्या झाली आहे, असे राबिया यांनी म्हटले होते. पोलिसांकडून याप्रकरणाचा योग्य रितीने तपास सुरू नसल्यामुळे हा तपास एसआयटीकडे देण्यात यावा, अशी राबिया खान यांची मागणी होती. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
जियाने आत्महत्या केलेली नाही, तर सूरजने तिची हत्या केल्याचा आरोप करीत जियाची आई राबिया खान हिने सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सूरजने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सीबीआयने सूरजवर आरोपपत्र दाखल केले होते. स्थानिक पोलिसांकडून योग्य तपास केला जात नाही, असा आरोप करीत त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.