कॅनेडियन गायक जस्टिन बिबर १० मे रोजी मुंबईमध्ये गाणार असल्यामुळे सध्या सोशल मीडियावर सर्वत्र त्याच्याच नावाची चर्चा सुरु आहे. काही वर्षांपूर्वी ‘यु नो यु लव्ह मी’ या गाण्याद्वारे जस्टिनने त्याच्या आवाजाची जादू चाहत्यांवर चालवली. त्या गाण्याने खऱ्या अर्थाने जस्टिनला एक नवी ओळख दिली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दरम्यान, भारतातही मोठ्या प्रमाणावर जस्टिनचे चाहते असल्यामुळे त्याचा हा भारत दौरा चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच ठरणार आहे.

जस्टिन बिबर ‘पर्पज वर्ल्ड टूर’ (The Purpose World Tour) या संकल्पनेअंतर्गत भारतातील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये तो लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार असून, कार्यक्रमाचे तिकीट मिळवण्याकरिता दोन महिने अगोदरच लोकांची धावपळ सुरु झाली होती. त्याच्या या कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. जीए२, जीए स्टॅण्ड्स, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम विभागातील तिकीटं अजूनही उपलब्ध असून, तुम्ही ती ईएमआयवरही विकत घेऊ शकता. या कार्यक्रमाच्या तिकीटाकरिता कमीत कमी ५०४० रुपये मोजावे लागत आहेत. तर प्लॅटिनम तिकीटाची किंमत १५४०० रुपये इतकी आहे.

काही दिवसांपूर्वीच जस्टिनने त्याच्या कार्यक्रमाचे ७५ हजार रुपयांचे प्रिमियम तिकीट मुंबईतील एका रिक्षा चालकाच्या मुलाला भेट स्वरुपात दिल्याचे समोर आले. जस्टिनच्या या चाहत्याला त्याला भेटण्याची संधीदेखील मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायकाच्या कार्यक्रमाला १०० वंचित मुलांनादेखील उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. या मुलांसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी एक खास जागा तयार करण्यात आली असून त्यांना एकही पैसा खर्च न करता जस्टिनच्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.