‘सैराट’फेम रिंकू राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला ‘कागर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये रिंकूची प्रमुख भूमिका असल्यामुळे ती कोणत्या अंदाजात झळकणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. ‘कागर’मध्ये रिंकूच्या नावावर शिक्कामोर्तब जरी करण्यात आला असला तरी प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोण झळकणार हे अद्याप गुलदस्त्याच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली असून त्यात आणखी एक भर पडली आहे. या चित्रपटातील एका गाण्याचा मेकिंग व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली असून उदाहरणार्थ निर्मिती संस्थेच्या सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून या चित्रपटासाठी रिंकू प्रचंड मेहनत घेत आहे. याचाच प्रत्यय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून येत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू काही दिलखेचक अदा करताना दिसत आहे.

दरम्यान, कागरच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर पेजवर गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात रिंकू एका उडत्या चालीच्या गाण्यावर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना रिंकू भलतीच खुशीत आहे आणि ती नाचताना धमालही करत आहे. तसंच ‘लवकरच येतोय कागर’ असं सांगायलाही ती विसरत नाही. या गाण्याच्या चालीवरून चित्रपट कसा असेल याचा एक अंदाजही बांधता येईल. मात्र, रिंकूच्या या दिलखेच अदा प्रेक्षकांना नक्कीच भुलवतील यात काहीच शंका नाही.