भारतासह संपूर्ण जगभरात सध्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाचा फिव्हर पाहायला मिळतो आहे. कबाली चित्रपटाने तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घातला असून, चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या यशाबद्दल खुद्द सुपरस्टारने चित्रपटाशी निगडीत व्यक्तींसाठी आणि चाहत्यांसाठी खास स्वतःहून एक आभार पत्र लिहिले आहे.
“जगभरात केवळ पाच दिवसांमध्ये २०० कोटींची कमाई करणारा कबाली हा एकमेव चित्रपट बनला आहे. मंगळवारी जगभरात तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या कबालीने २०५ कोटींहून अधिक कमाई केली,” असे व्यापार विश्लेषक त्रिनाथ यांनी आयएएनएसला सांगितले.
“भारतात प्रदर्शनाच्याच दिवशी या सिनेमाने १०० कोटींची कमाई केली. स्थानिक बाजारपेठेत साधारणतः १२८ कोटींचा गल्ला कबालीने कमावला. आतापर्यंत कोणत्याही दाक्षिणात्य सिनेमांनी एवढी कमाई केली नव्हती,” असे ते म्हणाले.
मलेशियामध्ये तिथल्या तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढणारा डॉन अशी या सिनेमाची कथा आहे.
स्वतः लिहिलेल्या पत्रात त्यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, वितरक, थिएटर मालक आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
“कबाली यशस्वी करणाऱ्या प्रत्येक माणसाचा मी कृतज्ञ आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, वितरक, थिएटर मालक आणि चाहत्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.” असे रजनीकांत म्हणाले.
या पत्रात, त्यांनी त्यांच्या अमेरिकेतील विश्रांतीबद्दलही सांगितले. “मी कबाली आणि शंकरचा पूढचा चित्रपट २.0 साठी सतत काम करत होतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची मला गरज होती. मी माझी मुलगी ऐश्वर्या धनुशबरोबर अमेरिकेत दोन महिन्यांच्या विश्रांतीसाठी गेलो. तिथेच काही वैद्यकीय चाचण्याही केल्या.” या विश्रांतीनंतर मला अधिक ताजेतवाने आणि प्रेरणादायी वाटते आहे, असेही ते पुढे म्हणाले.

 


व्हिडिओ- नरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात..