27 September 2020

News Flash

प्रेमाची दोन टोकं..

सध्या तिकीटबारीवर चर्चा आहे, ती ‘कबीर सिंग’ या चित्रपटाची..

|| अक्षय शेलार

सध्या तिकीटबारीवर चर्चा आहे, ती ‘कबीर सिंग’ या चित्रपटाची.. आतापर्यंत दोनशे कोटी रुपयांचा व्यवसाय केलेल्या या चित्रपटाविषयी बरीच साधकबाधक चर्चा झाली आहे. मात्र, त्यात मांडलेल्या प्रेमकहाणीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातूनही विचार करायला हवा. कारण शूजिंत सरकार दिग्दर्शित ‘ऑक्टोबर’ आणि संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘कबीर सिंग’ हे दोन चित्रपट म्हणजे प्रेमाची दोन टोकं आहेत.

लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगाचा ‘अर्जुन रेड्डी’ नावाचा तेलुगू भाषिक चित्रपट जेव्हा २०१७ मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा एखाद्या प्रेक्षकांना आवडेल अशा घटकांचा समावेश असलेल्या चित्रपटाला अपेक्षित असलेला प्रतिसाद त्याला मिळाला. कमी बजेटमध्ये तयार झालेला हा इंडिपेन्डन्ट अर्थात ‘इंडी फिल्म’ प्रकारात मोडणारा चित्रपट अल्पावधीतच लोकप्रिय झाला, त्याला आर्थिक पातळीवरही यश मिळालं. साहजिकच पैसे कमावण्याच्या संधीच्या शोधात असलेल्या निर्मात्यांना ‘अर्जुन रेड्डी’च्या रूपात एक आयतं आणि यापूर्वीही खणखणीत वाजलेलं नाणं गवसलं. आणि त्यातील जवळपास प्रत्येक दृश्यचौकटीची नक्कल करणारा, स्वत: संदीप रेड्डी वंगानेच दिग्दर्शित केलेला ‘कबीर सिंग’ हा त्याचा हिंदी भाषेतील रिमेक गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. ‘कबीर सिंग’च्या प्रदर्शनानंतर मात्र ‘अर्जुन रेड्डी’बाबत घडली नाही त्याहून कैकपटींनी अधिक चर्चा थेट देशपातळीवर घडून आली.

आता या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा काय, तर ‘कबीर सिंग हे पात्र स्त्रियांकडे भोगवादी नजरेतून पाहतं की नाही’. त्यानिमित्ताने अवघा सोशल मीडिया दोन गटांमध्ये विभागला गेला, आणि कित्येक ज्ञात-अज्ञात लोकांच्या सहभागाने यावर घमासान शाब्दिक युद्ध पेटले. आता खरंच चित्रपटात असं भोगवादी दृष्टिकोनातून पात्र आहे का, तर उत्तर असेल ‘हो, आहे’. मात्र, लेखक-दिग्दर्शक या पात्राचं उदात्तीकरण करतात का, आणि मुळात हा चित्रपट अगदी राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडून यावी इतपत महत्त्व देण्याच्या लायक आहे का या प्रश्नांची उत्तरं व्यक्तिसापेक्ष आहेत. बाकी काहीही असो, सदर चित्रपटानिमित्ताने प्रेक्षकांनी प्रेमाच्या काहीशा हिंस्त्र, तरीही पॅशनेट रूपाला भरघोस प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. एकीकडे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला शूजित सरकारचा ‘ऑक्टोबर’ नावाचा संयत आणि नितांतसुंदर चित्रपट दणकून आपटलेला असताना, दुसरीकडे ‘कबीर सिंग’ला मिळालेला भरघोस प्रतिसाद विचार करायला लावणारा आहे.

‘कबीर सिंग’ची कथा काय, तर एमबीबीएस करत असलेला दुराग्रही आणि रागीट स्वभावाचा कबीर पाहताक्षणीच मितभाषी प्रीतीच्या प्रेमात पडतो. तीही त्याच्या प्रेमात पडते. त्यांचं प्रेम फुलत असतानाच प्रीतीचे वडील दोन्ही कुटुंबांच्या जातींचा मुद्दा समोर ठेवत त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध दर्शवतात. प्रीतीचं तिच्या मनाविरुद्ध लग्न लावलं जातं आणि कबीरच्या स्वत:ला उद्ध्वस्त करण्याच्या प्रवासाला सुरुवात होते. प्रेमभंगामुळे दु:खी झालेला, स्वत:वर (आणि लग्न केल्याबद्दल) प्रीतीवर चिडलेला कबीर भावनिक, मानसिक पातळीवर उत्तरोत्तर उद्ध्वस्त होत जातो. मानवी प्रवृत्तीची, मूल्यांची घसरण होत असताना कबीरच्या स्वत:लाच उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या भावनांचा चढता आलेख इथे मांडला जातो. तसं पाहिलं तर प्रेमभंगात उद्ध्वस्त होणाऱ्या ‘देवदास’च्या जुन्याच कथेची ही पुनर्माडणी आहे असं म्हणता येईल. फक्त इथे त्याच्या भावना स्वत:च्या मानसिक, शारीरिक, भावनिक विनाशापुरत्या मर्यादित नाहीत. इथे त्याला तितक्याच तीव्र, हिंसक अशा विचारांचीच नव्हे, तर कृतींचीही जोड आहे. ज्यामध्ये इतरही अनेक लोक भरडले जात आहेत.

‘ऑक्टोबर’ याच्या अगदी उलट मांडणी असलेला आहे. शिऊ ली आणि डॅन हे दोघेही दिल्लीतील एका बडय़ा हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करतात. शिऊ ली मूलत:च जबाबदार आणि खाली मान घालून आपलं काम नेटकेपणाने करणाऱ्या प्रवृत्तीची आहे. याउलट डॅन बेजबाबदार, सर्वांकडून हेटाळणी केला जाणारा तरुण आहे. दोघांचा तसा फारसा संबंध येत नाही. अशा वेळी प्रेम वगैरे तर दूरची गोष्ट आहे. अशातच त्याच्या आयुष्याला सुरुंग लावणारी एक घटना घडते. एके रात्री हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची पार्टी सुरू असताना कठडय़ावर बसलेली शिऊ ली चौथ्या मजल्यावरून खाली पडते आणि कोमात जाते. त्यावेळी डॅन तिथे हजर नसतो. नंतर त्याच्या मित्राला या घटनेबाबत विचारलं असता शिऊ ली अपघात घडण्याच्या काही क्षणांपूर्वी ‘डॅन कहाँ हैं?’, म्हणत त्याची विचारपूस करत असल्याचं त्याला कळतं. ही क्षुल्लक मानावी अशी गोष्टच त्याच्या इतस्तत: पसरलेल्या आयुष्याला वळण प्राप्त करून देणारी ठरते. तोवर तिच्याबाबत काहीच न वाटणारा डॅन प्रेमाच्या, आशेच्या, छोटय़ाशा किरणाच्या निमित्ताने दवाखान्यातील बेडवर निपचित पडलेल्या शिऊ लीशी आणि तिच्या कुटुंबाशी जोडला जातो. तिच्या कुटुंबाची, तिची काळजी घेऊ  लागतो. त्यानिमित्ताने त्याच्या नीरस आयुष्यात, त्याच्या व्यक्तिमत्त्वात कुणीतरी प्राण फुंकले आहेत असं वाटतं.

वास्तविक पाहता ‘कबीर सिंग’ आणि ‘ऑक्टोबर’ यांची तुलना करण्याचं काही कारण नसलं तरी प्रेम या एकाच भावनेच्या पूर्णत: वेगळ्या अशा दोन टोकांची, त्यांच्या मांडणीची तुलना करण्यास काही हरकत नसावी. आता आशय, विषय ते मांडणीबाबत हे दोन्ही चित्रपट सर्वस्वी वेगळे असले तरी एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतण्याची, ती अस्तित्वात असण्याच्या निव्वळ कल्पनेने भारावून जाण्याची मानवी प्रवृत्ती ही या दोन्हींच्या नायकांमधील एक समान दुवा आहे. अशा वेळी एखाद्या व्यक्तीमध्ये पूर्णत: गुंतणं समान असलं तरी त्याबाबत व्यक्त होण्याचं स्वरूप किती भिन्न असू शकतं हे दिसून येतं. ज्यामुळे मानवी स्वभावाचे निरनिराळे पैलू आणि प्रेम नामक एकाच अमूर्त कल्पनेकडे पाहण्याचे भिन्न दृष्टिकोनही दिसून येतात.

‘कबीर सिंग’ त्याच्या रागीट, आत्मविघातक स्वभावाला जागत त्याची होणारी घुसमट, राग तीव्र अशा बाह्य़ स्वरूपात व्यक्त करतो. असं असलं तरी त्याची आत्मघातकी कृत्यं त्याच्यावर फारसा परिणाम करत नाहीत. त्याच्यात ना बदल घडतात, ना तो या राग, दुराग्रही असण्याच्या भावनांच्या पाशातून मुक्त होतो. चित्रपटाच्या सुरुवातीला तो जसा असतो, शेवटीही तसाच राहतो. याउलट डॅनची होणारी घुसमट. त्याची अस्वस्थता त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. शिऊ लीमध्ये गुंतणं त्याच्यात अंतर्गत पातळीवर द्वंद्व घडवून आणत त्याच्यात बदल घडवणारं ठरतं. ज्यामुळे चित्रपटातील भावनांच्या चढत्या आलेखासोबतच त्याच्या व्यक्तिमत्त्वातही बरेचसे बदल घडून येतात. सुरुवातीला अस्वस्थ असणारा, घुसमट होणारा, बेजबाबदार असणारा डॅन हळूहळू याच्या अगदी उलट बनतो. त्याला मानसिक पातळीवर काही प्रमाणात का होईना, पण स्थैर्य लाभते. कबीर सिंगला व्यक्त होण्यासाठी आपला राग, आपल्या मनातील हिंसा बाहेरच्या जगावर थोपवण्याची, तिचं प्रदर्शन मांडण्याची गरज भासते. तरीही त्याला मानसिक स्थैर्य तसं लाभत नाहीच. ‘ऑक्टोबर’ डॅनच्या भावना संयत आणि अलवारपणे मांडत जातो, सोबतच त्याच्या नायकाला स्थैर्य मिळवून देतो.

एकीकडे स्वघोषित संस्कृतीरक्षकांकडून (तथाकथित) धर्मबुडव्या प्रेमी युगुलांपासून ते श्रीराम म्हणवून घेण्यासाठी कोणाही व्यक्तीला मारहाण करण्याच्या घटना आजूबाजूला असताना ‘कबीर सिंग’ म्हणजे याच मुठी वळवणाऱ्या, रक्त सळसळवणाऱ्या घटनांचंच तर एक रूप नाही ना, त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता समाज म्हणून हिंसेकडे कल वाढतोय असं चित्र निर्माण करणारा तर नाही ना याचा विचार करण्याची वेळ आली आहे. संदीप रेड्डी वंगानंच एका मुलाखतीत सांगितलं होतं, की आपल्याला आवडणाऱ्या स्त्रीला आपण काही बोलू शकत नसू, झापड मारू शकत नसू, हव्या त्या पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त करत नसू, तर त्या नात्याला काय अर्थ आहे? संदीप रेड्डीच्या म्हणण्याचा अर्थ हक्क या अर्थाने घ्यायचा झाला, तरी त्यातून व्यक्त होणाऱ्या हिंसेकडे दुर्लक्ष कसं करणार? त्याची कलाकृती आणि त्याची स्वत:ची अभिव्यक्ती साधारण एकाच हिंसक (त्याच्या दृष्टीने पॅशनेट) दृष्टिकोनातून व्यक्त होणारी असेल तर तिला मिळणारा प्रतिसाद अस्वस्थ करणारा आहे.

सदर चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशापयशातील फरकाने मात्र बहुतांशी प्रेक्षकांना ‘कबीर सिंग’चं तीव्र, उग्र प्रेम अधिक आवडतं आहे, हे स्पष्ट केलं आहे. भलेही मग तो चित्रपट म्हणून फारसा ग्रेट नसला तरीही. याउलट ‘ऑक्टोबर’ची संयत मांडणी, अलवार प्रेमभावना बहुतांशी प्रेक्षकांना कंटाळवाणी आणि दुर्लक्ष करावीशी वाटली असावी. त्यामुळेच त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांच्यावर घडणाऱ्या (आणि ‘ऑक्टोबर’बाबत न घडणाऱ्या) चर्चाच्या रूपात हा फरक स्पष्टपणे दिसून आला आहे. एकूणच प्रेमाच्या या दोन टोकांना मिळालेला प्रतिसादही तितकाच टोकाचा आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2019 12:48 am

Web Title: kabir singh mpg 94
Next Stories
1  ‘ह्य़ांचं करायचं काय?’: मियां वीतभर, दाढी हातभर
2 दिशादर्शक टीआरपी
3 रहस्यमयी नातेप्रवास
Just Now!
X