‘कहानी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री विद्या बालन बरीच चर्चेत आली होती. पतीच्या शोधात एका गरोदर महिलेच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली विद्या बालन लवकरच कहानी २ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा नव्या रहस्यासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पण या चित्रपटाबद्दल तुर्तास काही बोलणे अयोग्यच आहे. अर्जुन रामपाल आणि विद्या बालन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘कहानी २’ या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच कथानकाला हात घालण्यात आला आहे. या चिचित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्यातील विद्या बालनच्या अभिनयाची झलक अनेकांची दाद मिळवत आहे. अज्ञातांचा फोन येणाऱ्या आणि मुलीच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या एका महिलेच्या भूमिकेमध्ये विद्या दिसत आहे. मुलीच्या शोधात निघालेल्या विद्याचा अपघात होतो आणि ती कोमात जाते. विद्या कोमामध्ये गेल्यानंतर पुढे या चित्रपटाचे कथानक त्या रहस्याभोवती कसे फिरते याची झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. स्वतः विद्यानेच तिच्या ट्विटर हॅण्डलवरून फर्स्ट लूक शेअर केला होता. यामध्ये ती फरारी आरोपीच्या भूमिकेत दिसत होती. या चित्रपटात ती ‘दुर्गा राणी सिंग’ या ३६ वर्षीय वंचित आरोपीची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी ‘कहाणी’ या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात विद्याने एका गरोदर महिलेची भूमिका साकारली होती. संपूर्ण चित्रपटात उदरात बाळ असल्याचे भासविल्यानंतर चित्रपटाच्या अखेरीस ती गरोदर नसल्याचे समोर आले होते. तिच्या या रहस्यमय चित्रपटातील भूमिकेमुळे ती कौतुकास पात्र देखील ठरली होती.

‘कहानी’च्या पहिल्या भागाप्रमाणे सिक्वलचे दिग्दर्शनही सुजॉय घोषच करणार आहे. विद्याच्या ‘कहानी २’ची झलक ही थक्क करणारी असल्यामुळे तिच्या पहिल्या ‘कहाणी’प्रमाणे या दुसऱ्या कहाणीत नक्की काय रहस्य असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता असेल. दरम्यान, विद्या बालनचा ‘कहानी २’ आणि आलिया भट्टचा ‘डियर जिंदगी’ या दोन चित्रपटांमध्ये टक्कर होऊ नये यासाठी निर्माता जयंतीलाल यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या विद्याची कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांना २ डिसेंबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.