मराठी सिनेमांचा ओघ हा पूर्वीपेक्षा काही प्रमाणात वाढला असून नवनवीन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांची संख्या ही त्याचप्रमाणे वाढत आहे. अभिनेता बनण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचेच असते. परंतु मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर अधिक मेहनत घेतली तर आपल्याला यशापासून नक्कीच कोणी लांब ठेवू शकत नाही याचा खराखुरा प्रत्यय आला आहे तो अभिनेता कैलास वाघमारेला.
जालना जिल्ह्यातील चांदई या छोट्याश्या गावात जन्माला आलेल्या कैलासने कॉलेजमध्ये असताना अनेक पथनाट्य, एकांकिका, लोकनाट्य यामध्ये सहभाग घेऊन अभिनेता बनण्याचे स्वप्न हे उराशी बाळगले होते. एम. ए मराठी पर्यंतचे शिक्षण घेऊन मुंबई येथे नाट्यशास्त्राचे दोन वर्षाचे शिक्षण हे त्याने वामन केंद्रे यांच्याकडून घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही लहान-लहान नाटकातून भूमिका साकारण्यास त्याने सुरुवात केली. याच दरम्यान सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्याशी त्याची भेट झाली आणि सह्याद्री वाहिनीवर त्यावेळी सुरु असलेल्या “माझी शाळा” या मालिकेत त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर संदेश भंडारे यांच्या “महादू” या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. संभाजी भगत यांच्या “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या नाटकामुळे कैलासला खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख मिळाली.
आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची निर्मिती असलेला, पांडुरंग जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी “मनातल्या उन्हात” या सिनेमात कैलास अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. मराठी सिनेसृष्टीत आज एवेढे मोठ-मोठे अभिनेते असताना या सिनेमासाठी दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि संधी दिली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला या चित्रपटातील अभिनयासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. या चित्रपटातील माझी भूमिका ही अत्यंत आव्हानात्मक असून वय वर्ष २० ते ६५ वर्षापर्यंतची व्यक्तिरेखा मी या चित्रपटात साकारली आहे.चित्रपटातील भाषेचा लहेजाही पूर्णपणे वेगळा असल्याने मी त्यासाठी वेगळी मेहनत घेतली. एका सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना या सातत्याने घडत जातात आणि त्या परिस्थितीशी तो कसा समोर जातो याचे चित्रण “मनातल्या उन्हात” या सिनेमात तुम्हाला पाहता येणार असल्याचे अभिनेता कैलास वाघमारे यांनी सांगितले.
या चित्रपटात अभिनेते किशोर कदम, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मिताली जगताप बालकलाकार हंसराज जगताप, मंथन पाटील आणि ओवेशिक्षा पाटील यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहता येणार आहेत. येत्या जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2015 रोजी प्रकाशित
छोट्याश्या गावात जन्मला अभिनेता!
मराठी सिनेमांचा ओघ हा पूर्वीपेक्षा काही प्रमाणात वाढला असून नवनवीन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार ह्यांची संख्या ही त्याचप्रमाणे वाढत आहे.
First published on: 07-04-2015 at 11:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kailas waghmare is debuting as actor