सध्या बायोपिकची चलती आहे. समाज,राजकारण,कला,क्रीडा अशा क्षेत्रांमधील विविध दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर आतापर्यंत चरित्रपट झाले आहेत. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता व त्यांची सहकारी शशिकला यांच्या जीवनावर आधारित एक चरित्रपट येत असल्याचे समजले असून या चित्रपटात भूमिका करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री काजोल व अमला पॉल यांना विचारण्यात आले आहे.

हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक केथीरेड्डी जगदीश्वर रेड्डी यांनी सांगितले की, “या चित्रपटाबाबत काजोल व अमलाशी आमचं बोलणे सुरु आहे. आम्ही त्यांना स्क्रिप्ट पाठवली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघत आहोत. काजोलच्या प्रतिसादाची मी आतुरतेने वाट पाहतोय कारण मी तिचे सासरे, वीरू देवगण यांच्यासोबत काम केले आहे. पद्मालय स्टुडिओजसाठी आम्ही एकत्र काम केले आहे. मी त्या दोघींना भेटूनही स्क्रिप्ट ऐकवणार आहे.” हा चित्रपट तमिळ, तेलुगूसोबत हिंदी व कानडी भाषेतही प्रदर्शित करण्याचा त्यांचा विचार आहे.

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटांवर सध्या अनेक निर्माते काम करत आहेत. एका चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारत असून हा चित्रपट विजय दिग्दर्शित करणार आहेत. ‘आयर्न लेडी’ असाही एक चरित्रपट यांच्या आयुष्यवर येत असून यामध्ये अभिनेत्री नित्या मेनन झळकणार आहे. हा चरित्रपट प्रियदर्शिनी दिग्दर्शित करणार आहे. निर्माते गौतम वासुदेव मेनन सुद्धा जयललितांच्या जीवनप्रवासावर आधारित एक वेब सीरिज दिग्दर्शित करत आहेत.

सगळ्या गोष्टी योग्य जुळून आल्या तर ऑगस्ट २०१९ मध्ये शूटिंग सुरु करण्याचा रेड्डी यांचा मानस आहे. सध्या त्यांचे सहकारी चित्रपटासाठी लागणारे संशोधन करत आहेत.