प्रसार भारतीच्या बैठकांना उपस्थित न राहिल्याने अभिनेत्री काजोलची कार्यकारी मंडळातून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या कामाचे पर्यवेक्षण करणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांमध्ये गेल्या वर्षी काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. प्रसार भारती कायद्यातील तरतुदींनुसार, बोर्डाच्या सलग तीन बैठकांना परवानगी न घेता अनुपस्थित राहणाऱ्या सदस्याला पदत्याग करावा लागतो. काजोलने शेवटच्या सभेला उपस्थिती लावली होती की नाही हे जाणून घेण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसार भारतीला एक पत्र पाठवले आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली काजोल वर्षभरात झालेल्या लागोपाठ तीन बैठकांना गैरहजर होती. याविषयी तिने कोणतीही पूर्वकल्पनादेखील दिली नव्हती. तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी काजोलची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पण काही कारणांमुळे ती गेल्या काही सभांना येऊ शकली नाही, असे तिच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे.

व्यावसायिक जबाबदारी आणि घरगुती कारणांमुळे काजोलला शेवटच्या ३-४ बैठकांना उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, त्याआधीच्या बैठकांमध्ये ती न चुकता उपस्थित राहिली होती. सध्या परिस्थिती तिच्या हाताबाहेर असल्यामुळे तिला बैठकीला उपस्थित राहता आले नाही, याबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली आहे, असेही तिच्या प्रवक्त्याने सांगितले.