17 December 2018

News Flash

किमान काजोलला तरी सोडा – कमल हसन

कॅप्शनवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरूवात केली

अभिनेता कमल हसन

सोशल मीडिया आणि सेलिब्रिटी हे काही वेगळंच समीकरण आहे. सोशल मीडियावर एखादी व्यक्ती कधी ट्रोल होईल हे काही सांगता येत नाही. त्यातही सेलिब्रिटी ट्रोल होण्याची संख्या तर जास्तच. दिवसभरात एखादा कलाकार तरी काही ना काही कारणांमुळे ट्रोल होत असतो. आता हेच पाहा ना कोलकातामध्ये २३व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (KIFF) अमिताभ बच्चन, कमल हसन आणि कजोल एकत्र भेटले होते. काजोलने या दोघांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण नेमकी याच फोटोमुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली होती.

हा फोटो शेअर करताना तिने ‘दोन महानायकांसोबत सेल्फी..,’ असं कॅप्शन दिले. नेमक्या या कॅप्शनवरूनच नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरूवात केला होता. बिग बी आणि कमल हसन यांच्यासोबत काढलेल्या फोटोला काजोलने चुकून सेल्फी म्हटलं. यावर काही चाहत्यांनी तिलाच उलट प्रश्न विचारला की हा सेल्फी आहे का? ट्विटरकरांच्या याच प्रश्नांना उत्तर देत कमल हसन म्हणाले की, ‘कृपया या सगळ्यातून काजोलला तरी सोडा. मी सेल्फीचा चाहता नाहीये. पण या दोघांचा मात्र नक्कीच आहे. असं कोणालाही ट्रोल करणं चांगलं नाही.’
कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काजोल, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांच्याशिवाय शाहरुख खानही उपस्थित होता.

काजोलचा ‘व्हीआयपी २’ सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात तिने दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबत काम केले होते. सुमारे २० वर्षांनी तिने तमिळ सिनेमात काम केले होते. ‘व्हीआयपी २ लालकर’ या नावाने हा सिनेमा हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तर कमल हसनही लवकरच राजकारणात प्रवेश करतील असे म्हटले जात आहे. स्वतः हसन यांनी मात्र याबाबत गुप्तताच बाळगली आहे. सध्या ते ‘इंडियन २’ सिनेमाच्या कामात व्यग्र आहेत. तसेच अनेक महिन्यांपासून प्रदर्शनाची वाट पाहत असलेला त्यांचा ‘विश्वरुपम २’ सिनेमा अखेर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

First Published on November 14, 2017 6:19 pm

Web Title: kajol trolled selfie kamal haasan amaitabh bachchan