‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा शो सुरु होऊन आता पाच आठवडे उलटून गेले आहेत. प्रत्येक स्पर्धक ‘बिग बॉस’मध्ये टिकून राहण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान बिग बॉसच्या घरात कर्णधारपदासाठी एक टास्क झाला. या टास्कमध्ये जॅस्मिन भसिन आणि कविता कौशिक या दोन स्पर्धकांनी भाग घेतला होता. अन् हा टास्क जिंकण्यासाठी दोन्ही स्पर्धक जवळपास २० तास एका लहानशा खोक्यात बंद राहिले होते.

कर्णधार हा बिग बॉसच्या घरातील प्रमुख असतो. हा स्पर्धक आठवड्याच्या शेवटी एलिमिनेट होत नाही. या नियमामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती कर्णधार होण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसतो. अर्थात हे प्रयत्न यंदाही पाहायला मिळाले. परंतु यंदाच्या टास्कवर प्रेक्षक मात्र खुश नाहीत. त्यांनी या बॉस्कवाल्या टास्कची तुलना बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये झालेल्या टास्कशी केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्यावेळी काम्या पंजाबी आणि संग्राम सिंह हे दोन स्पर्धक तब्बल ४१ तास १६ मिनिट एका लहानशा खोक्यात बंद राहिले होते. हा टास्क केवळ एक मिनिटांनी काम्याने जिंकला होता. अद्याप हा विक्रम बिग बॉसमध्ये कोणालाही मोडता आलेला नाही. शिवाय अशी अटीतटीची स्पर्धा १४ व्या सिझनमध्ये पाहायला मिळत नाहीये अशी तक्रार हा बॉस्कवाला टास्क पाहून प्रेक्षक करत आहेत.