News Flash

चित्रीकरणादरम्यान कंगना पुन्हा जखमी, रुग्णालयात दाखल

पायात प्लास्टर असल्यामुळे सध्या ती व्हीलचेअरवरच आहे

कंगना रणौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मणिकर्णिका सिनेमाच्या चित्रीकरणावेळी ती पुन्हा एकदा जखमी झाली असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. जोधपूरमधील एका किल्ल्यात सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते. बुधवारी सकाळी चित्रीकरण सुरु असताना तिच्या पायाला दुखापत झाली. तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्या पायाला प्लास्टरही लावण्यात आले. पायात प्लास्टर असल्यामुळे सध्या ती व्हीलचेअरवरच आहे.

याआधीही ती हैद्राबादमध्ये सिनेमाचे चित्रीकरण करत असताना जखमी झाली होती. तलवारबाजीच्या एका दृश्याचे चित्रीकरण करताना समोरच्या कलाकाराची तलवार तिच्या डोक्याला लागली होती. तलवार एवढ्या जोरात तिच्या डोक्यावर बसली की तिला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. तिला १५ टाकेही पडले होते. नुकतेच सोशल मीडियावर चित्रीकरणादरम्यानचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते.
या फोटोंमध्ये कंगना साडीमध्ये दिसत आहे. हा सिनेमा झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे कंगनाचा सिनेमातील व्हायरल झालेला लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या सिनेमाची संपूर्ण टीम सध्या जयपूरमध्ये दाखल झाली असून सिनेमासाठीचा सेटही उभारण्यात आला आहे.

या सिनेमात कंगनाव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, अंकिता लोखंडे हे प्रसिद्ध चेहरेही पाहता येणार आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकांबद्दलची फारशी माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही. या सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर मर्दानी झाशीच्या राणीचे धाडसी रुप पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे हे खरे. या सिनेमाच्या चित्रीकरणाचे एकंदर वेळापत्रक पाहता, २७ एप्रिल २०१८ मध्ये झाशीच्या राणीच्या रुपातील कंगना प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्या या आगामी सिनेमाबद्दल उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 6:50 pm

Web Title: kangana ranault hurt during the shoot of film manikarnika
Next Stories
1 VIDEO : अजमेर शरीफच्या दर्ग्यात पोहोचली अंकिता लोखंडे
2 स्वत:च्या लग्नासाठी या अभिनेत्याने उघडली ‘मॅट्रिमोनियल साइट’
3 Bigg Boss 11: अर्शी खान खोटारडी, तिच्या आईनेच केला खुलासा
Just Now!
X