बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. ‘छपाक’ हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे अनेकांचं लक्ष चित्रपटाकडे वेधलं आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांची या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. त्यातच अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील हा ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिका आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

कंगना रणौतची बहीण रंगोली हिच्यावरदेखील अॅसिड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून रंगोली बचावली मात्र तिच्या चेहऱ्यावर अजून त्या जखमा तशाच आहे. विशेष म्हणजे रंगोली खंबीर असल्यामुळे ती या साऱ्याचा सामना करु शकली. त्यामुळेच ‘छपाक’चा ट्रेलर पाहिल्यानंतर कंगनाला रंगोलीवर झालेल्या हल्ल्याची आठवण झाली. त्यामुळेच एका व्हिडीओच्या माध्यमातून कंगनाने रंगोलीवर झालेल्या हल्ल्याचं कथन करत ‘छपाक’ची निर्मिती करणं योग्य असल्याचं म्हटलं आहे.

”छपाक’ ट्रेलर पाहिल्यानंतर मला माझ्या बहिणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याची आठवण झाली. त्यावेळी परिस्थितीशी लढा देत असतानादेखील रंगोली केवळ माझ्यासाठी आणि कुटुंबियांसाठी मोठ्या धीराने या सगळ्याला सामोरी गेली. त्यावेळी तिचं धीराने, खंबीरपणे प्रत्येक गोष्टीला सामोरं जाणं हे मला खूप काही शिकवून गेलं. आजही मी कोणत्या संकटात असले तर तिच्या त्या काळातल्या आठवणी मला प्रत्येक गोष्टीशी लढा देण्याचं बळ देतात”, असं कंगना म्हणाली.


पुढे ती म्हणते, “मेघना गुलजार आणि दीपिकाने हा विषय हाताळल्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार मानते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या साऱ्या नराधमांना चपराक बसणार आहे ज्यांनी महिलांसोबत असं कृत्य करण्याची हिंमत केली”.

वाचा : Photo : ‘श्वास’ चित्रपटातला चिमुकला आठवतोय? पाहा आता कसा दिसतो

दरम्यान, मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीदेखील झळकणार आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. तसेच मालती उर्फ दीपिकाला अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे.