बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. आता कंगनाने सद्गुरू नावाने ओळख असलेल्या आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर निशाणा साधला आहे. सद्गुरूंच्या ट्रोलर्सला कंगनाने ‘उंदराची बुद्धी’ असलेले आणि ‘कीटक’ म्हटलं आहे.

८ मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त सद्गुरूंनी “स्त्रीत्व एक लिंग नसून मानवाची एक बाजू आहे” असे ट्विट केले होते. या ट्विटवरून दिग्दर्शक हंसल मेहता पासून अनेकांनी विनोद केला होता. या सगळ्या ट्रोलर्सला टोला लगावत कंगनाने ट्विट केले.

“उंदराची बुद्धी आणि किड्यासारखं जीवन जगणारे मूर्ख सद्गुरूंवर स्त्रीत्वाला एक लिंग न मानता मानवाची एक बाजू म्हटल्याबद्दल टीका करत आहेत. पण त्यांना हे ऐकून धक्का बसेल की त्यांच्यामध्ये देखील सूर्य आणि चंद्र, त्यांची आई आणि वडील, ताकदवर आणि नाजूक अशा दोन्ही बाजू आहेत. मुर्खांनो स्वत:ची जरा तरी लाज बाळगा.” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

एवढंच नाही तर पुढे ट्विट करत कंगना म्हणाली, “ही फक्त एका व्यक्तीवर केलेली टीका नाही तर समाज व्यवस्था, पूर्ण संस्कृती, धर्म आणि या देशाला केलेली आहे. सद्गुरू हे भारताच्या प्राचीन गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळेच शिवरात्री जवळ आल्याने या किड्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय.उद्या सद्गुरूंचा सगळ्यात आवडता उत्सव असून ते उद्या शिवाचा उत्सव साजरा करणार आहेत.”

तर कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. तसेच तिचा ‘धाकड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.