अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन आता महिना उलटला आहे. मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील कारणं स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यातच वकील इशकरण सिंह भंडारी यांनी सुशांतच्या चाहत्यांना मेणबत्ती लावून सुशांतला श्रध्दांजली वाहण्याचं आवाहन केलं होतं. या मोहिमेमध्ये सुशांतच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनीही सहभाग घेतला असून कंगना रणौतनेदेखील सुशांतसाठी दिवा लावून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

कंगनाने सुशांतसाठी दिवा लावला असून याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत तिने #CandleForSSR असा हॅशटॅगही दिला आहे. कंगनाप्रमाणेच अभिनेत्री अंकितानेदेखील सुशांतसाठी दिवा लावत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.


दरम्यान,सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून अभिनेत्री कंगना रणौतने कलाविश्वातील घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून ही हत्या असल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या या मुद्द्यावरुन अनेक वाद आणि चर्चा कलाविश्वात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.