एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर स्वत:ला बुद्धिजीवी समजणाऱ्या बॉलिवूड कलाकारांच्या तोंडून चकार शब्द निघत नाही, असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौतने राग व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एका गावचा सरपंच असलेल्या अजय पंडिता यांच्या हत्येवर ती व्यक्त झाली. काश्मिरी पंडित असलेल्या अजय पंडिता यांना फुटिरतावाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं. मात्र या हत्येवर अनेक कलाकारांनी मौन बाळगल्याची टीका कंगनाने केली आहे. सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

“आपल्या इंडस्ट्रीतले जे हुशार कलाकार आहेत, जे स्वत:ला बुद्धिजीवी समजतात, ते नेहमी हातात दगड, मेणबत्ती, पोस्टर्स घेऊन एखाद्या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय बनवण्यासाठी रस्त्यावर उतरतात. मात्र तसं करण्यामागे जर एखादा जिहादी अजेंडा असेल तरच त्यांच्यातल्या माणुसकीला पेव फुटतो. मात्र जर कोणाला खरंच न्याय मिळवून द्यायचा असेल तर मात्र हे सर्वजण गप्प बसतात. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर रोज अन्याय होतोय. त्यावर कोणीच काही बोलत नाही. भरदिवसा काश्मिरी पंडिताची हत्या केली जाते, तरीसुद्धा सर्वांचं मौन आहे”, असं ती या व्हिडीओत म्हणतेय. या व्हिडीओच्या शेवटी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. देशातील काश्मिरी पंडितांना काश्मीरमधील त्यांची जागा मिळवून द्यावी, त्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशी विनंती तिने मोदींना केली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा व्हिडीओ पोस्ट करत अजय पंडिता यांच्या हत्येबाबत निषेध व्यक्त केला होता. या घटनेवर मौन का बाळगलं जात आहे, असा सवाल त्यांनीसुद्धा केला.