‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री कंगना रणौत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत होती. मात्र एका कार्यक्रमामध्ये कंगनाने या मुद्द्यावर भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘भाजपाच काय तर अन्य कोणत्याही पक्षामधून मी राजकारणात प्रवेश करणार नाही’, असं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे.

कंगना सध्या तिच्या आगामी ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यातच काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कंगनाला राजकारणात प्रवेश करण्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तर देत तिने राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं ठामपणे सांगितलं.

“भारतीय जनता पार्टीच काय, मी अन्य कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीये. मी बेधडकपणे बोलत असते, त्यामुळे माझ्या अशा स्वभावामुळे मी राजकारणात टिकू शकत नाही. मी कोणत्याही पक्षामध्ये बांधून राहिल्यासारखं काम करु शकत नाही”, असं कंगनाने यावेळी सांगितलं.

पुढे ती म्हणते, “पंतप्रधान नरेंद्र यांच्यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळते. ते ज्या पद्धतीने त्यांचं काम करतात, जबाबदारी पार पाडतात ते पाहून मला बरंच काही शिकायला मिळतं. टिकांकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत रहायचं हे मी त्यांच्याकडून शिकले. मात्र त्यांच्याशी मी माझी तुलना करत नाहीये”.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगना राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच नाही तर ती हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील मतदार संघातून भाजपाच्या बाजूने राजकारणात उतरु शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती.