अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असं सांगणारा रिपोर्ट एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग नंबर एकला ट्रेण्ड होताना दिसत आहे. ”सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सिद्ध करु शकले नाही, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन”, असं वक्तव्य कंगना रणौत जुलै महिन्यामध्ये केलं होतं. मात्र, एम्स रुग्णालयाकडून आलेल्या रिपोर्टनंतर सोशल मीडियावर सेलिब्रिटींसह अनेकांनी तिच्याकडे पद्मश्री पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. परंतु, या सगळ्यावर कंगनाने मौन सोडलं असून तिचं मत व्यक्त केलं आहे.

“स्मरणशक्ती कमी असेल तर ही मुलाखत परत पाहा. जर मी कोणतेही चुकीचे किंवा खोटे आरोप लावले असतील तर माझे सगळे पुरस्कार परत करेन. हे एका क्षत्रिय व्यक्तीचं वचन आहे. मी श्रीरामाची भक्त आहे. प्राण जाए पर वचन न जाए. जय श्री राम”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. सोबतच तिने त्याच्या मुलाखतीची लिंकदेखील शेअर केली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांवर निशाणा साधला होता. तसेच सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे तिने म्हटले होते.

एम्सच्या अहवालात काय?
सुशांतची हत्या झाल्याचा दावा खोडून काढणाऱ्या एम्सच्या रिपोर्टमध्ये हे प्रकरण आत्महत्येचेच असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.