अभिनेत्री कंगना रणौतला ढोंगी म्हणत अभिनेत्री नगमाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. कंगनाचं संपूर्ण करिअर हे घराणेशाहीच्या स्तंभावर उभं असल्याची टीका या फोटोतून करण्यात आली आहे. ज्यामध्ये आदित्य पांचोली, महेश भट्ट, इम्रान हाश्मी, हृतिक रोशन आणि रंगोली चांडेल यांच्यासोबत कंगनाचे फोटो आहेत. हा प्रत्येक व्यक्ती घराणेशाहीशी कसा जोडला गेला आहे, हे त्यात लिहिण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंगनाने स्वत:च्या बहिणीलाच मॅनेजर बनवल्याचं लिहित घराणेशाही ती स्वत: करत असल्याची टीका केली आहे. त्यावर आता टीम कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवरून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.

या प्रत्येक व्यक्तीबाबत टीम कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

काय आहे टीम कंगनाचं ट्विट?
नगमाजी,
१- आदित्य पांचोली कंगनाचा बॉयफ्रेंड नव्हता आणि हे तिने अनेकदा स्पष्ट केलं होतं. सुरुवातीला त्याने तिला मार्गदर्शन करेन असं म्हटलं होतं पण गोष्टी त्याविरुद्धच घडल्या. ती जेव्हा पण ऑडिशन किंवा शूटिंगला जायची तेव्हा तो तिला मारहाण करायला. पांचोलीने कंगनाची मुलाखत अनुराग बासूशी करून दिली नव्हती.

२- गँगस्टर या चित्रपटासाठी कंगनाने ऑडिशन दिलं होतं, तिथे घराणेशाहीचा प्रश्नच येत नाही.
३- कंगनाला ‘काइट्स’मध्ये बॅकग्राऊंड अॅक्टरची भूमिका दिली तेव्हाच तिचं करिअर उध्वस्त झालं होतं. त्यामुळे तिला क्रिशमध्ये काम करायचं नव्हतं पण तिला काम करण्यास भाग पाडलं गेलं.

४- कोणतीही एजन्सी कंगनाचं काम बघण्यास तयार नव्हती कारण ती कोणाच्या लग्नात नाचायला तयार नव्हती जिथे लोक तिच्यावर पैसे फेकतील. ती कोणत्याही फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नव्हती. म्हणूनच रंगोलीने तिचं काम पाहण्यास सुरुवात केली. त्यावेळी रंगोलीला इंग्रजीसुद्धा नीट बोलता येत नव्हती आणि बॉलिवूडबद्दल तिला काहीच माहित नव्हतं. एका बहिणीच्या नात्याने तिने कंगनाला मदत केली. अशा खोट्या अफवा पसरवू नका.