लग्नसोहळ्यात सेलिब्रिटी कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च करतात. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी विविधप्रकारची पक्वान्न ठेवली जातात. मात्र बरेचदा लग्नातले अर्ध्याहून अधिक पदार्थ हे वाया जातात. अन्नाची नासाडी ही मोठ्या प्रमाणात होते. एका अहवालानुसार सर्वाधिक खाण्याची नासाडी ही लग्नसोहळ्यात होत असल्याचं समोर आलं आहे. या सर्व भीषण परिस्थितीची कल्पना असल्यानं कपिलनं लग्नातील जेवण एका स्वयंसेवी संस्थेला दान केलं. या संस्थेमार्फत भुकेल्यांना अन्न दिलं जातं.

प्रेयसी गिन्नीसोबत १२ डिसेंबरला कपिल विवाहबंधनात अडकला. यावेळी लग्नातील उरलेलं अन्न कपिलनं फिडिंग इंडिया या स्वयंसेवी संस्थेला दान केलं आहे. ही संस्था उरलेलं अन्न गोळा करून ते भुकेल्यांना पुरवते. या संस्थेनं कपिलला उरलेलं अन्न दान करण्याची विनंती केली होती. या संस्थेचं काम लक्षात घेऊन कपिलनं मदत करण्याची तयारी दर्शवली.

रिसेप्शनसह अन्य सोहळ्यातील अन्न कपिलनं दान करण्याचा निर्णय घेतला. ‘अन्न वाया घालवण्यापेक्षा कपिलमुळे कित्येकांना एकवेळचं जेवायला मिळालं. कपिलनं एक चांगला आदर्श घालून दिला आहे. या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं आहे. ‘ असं म्हणत फिडिंग इंडिया या स्वयंसेवी संस्थेचा संस्थापक अंकितनं कपिलचं कौतुक केलं आहे.