‘कॉमेडीचा बादशहा’ कपिल शर्मा पुढील महिन्यात छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. जवळपास आठ महिन्यांहूनही अधिक काळ तो छोट्या पडद्यापासून पूर्णपणे लांब गेला होता. सहकलाकरांसोबत उडालेले खटके, कमी झालेला टीआरपी या अनेक कारणांमुळे नैराश्येत अडकलेल्या कपिलनं झगमगत्या दुनियेपासून स्वत:ला लांब ठेवलं होतं. मात्र आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी सलमानच्या मदतीनं तो आपलं साम्राज्य उभारणार आहे. कपिल पुनरागमन करणार हे चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे मात्र त्याच्यासोबत नव्या शोमध्ये कोणते विनोदवीर दिसणार यांचंही अनेकांना कुतूहल होतं अखेर कपिलच्या नव्या टीममधली काही नावं समोर आली आहेत.
यात पहिलं नावं आहे सुनील ग्रोव्हरचं. सुनील आणि कपिलनमधली भांडणं ही सर्वश्रुत आहेत. छोट्या पडद्यावरची कपिल -सुनीलची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय होती. मात्र कपिलच्या वागण्यामुळे दोघांच्या नात्यात कायमचा दुरावा आला. आता सलमानच्या सांगण्यावरुन कपिल आणि सुनील एकत्र काम करणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून समजत आहे.
पण त्याचबरोबर कपिल त्याचे कट्टर प्रतिस्पर्धी भारती आणि कृष्णा या दोघांनाही आपल्या शोमध्ये संधी देणार असल्याचं समजत आहे. कपिल छोट्या पडद्यापासून दूर गेल्यानंतर भारती आणि कृष्णा या दोन विनोदवीरांनी संधीचं सोनं करतं कॉमेडी शो केले. याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता हेच प्रतिस्पर्धी कपिलसोबत गुण्यागोविंदानं एकाच स्टेजवर नांदणार का हेही पाहण्यासारखं ठरणार आहे.
किक्कू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर असे जुने सहकलाकारदेखील ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पाहायला मिळणार आहे.
२३ डिसेंबर पासून ‘द कपिल शर्मा’ शो सुरू होत आहे. पण त्याआधी कपिल प्रेयसी गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 19, 2018 10:48 am