एक ना अनेक कारणांमुळे रोज ‘पद्मावती’ चित्रपट सध्या चर्चेत राहतोय. चित्रपटात राजपूतांच्या भावना दुखावल्या जात असल्याच्या आरोपावरून अनेक वाद होत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनीही ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. हे प्रकरण इतके चिघळले की दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीसही भाजप नेत्याने जाहीर केले.

वाचा : सनीच्या ‘तेरा इंतजार’ टीमने जिंकली ‘बार्बी’ कंपनीविरोधातील याचिका

अनेक राजकीय नेते आणि काही धार्मिक संघटना चित्रपटाला विरोध करत असतानाच संपूर्ण बॉलिवूड मात्र ‘पद्मावती’च्या बाजूने एकजूट झाले आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्माचाही समावेश झाला असून, त्याने हे प्रकरण दुःखद असल्याचे म्हटले.

वाचा : ‘पद्मावती’चा वाद एकीकडे आणि रणवीर- दीपिकाचे प्रेम एकीकडे

‘खरंतर याविषयी मी गोंधळलो आहे. काहीजण म्हणतात सेन्सॉरने चित्रपट बघितला आहे तर काहीजण बघितला नाही असे म्हणतात. नक्की यामागे काय कारण आहे? जे काही घडतंय ते पूर्णतः चुकीचे आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो आणि आपल्याला स्वतःची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, त्यामुळे तुम्ही कोणाचाही शिरच्छेद करू शकत नाही. एकीकडे तुम्ही, दीपिकाने आपल्या देशासाठी अभिमानास्पद काम केलंय असे म्हणता…. महिला सशक्तीकरणाच्या वार्ता करता…. पण दुसरीकडे तुम्हीच आता तिला दुखावत आहात. सध्याच्या वक्तव्यांमुळे प्रत्येकजण दुखावला जातोय. राहिला विषय चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तर ते सेन्सॉरच्या हातात आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह असल्यास त्यावर तेच निर्णय घेतील. मात्र, धमकी देणे चुकीचंच आहे’, असे कपिल म्हणाला.

कपिल सध्या त्याच्या आगामी ‘फिरंगी’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिल्लीमध्ये आहे. त्याचा हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होईल.