बॉलिवूडमध्ये अंगप्रदर्शन करणे काही नवीन राहिले नाही. महिलांना सिनेमांमध्ये एखाद्या वस्तूसारखे दाखवले जाते आणि उगाच गरज नसताना अंगप्रदर्शन होते असे आरोप अनेकदा झाले आहेत. या विषयावर बॉलिवूडमध्येही दोन मते आहेत. एक या अंगप्रदर्शनाच्या समर्थनात तर दुसरा गट विरोधात आहे. मात्र आता दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने या अशा अंगप्रदर्शनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल माफी मागितली आहे. करण जोहरची निर्मिती असणाऱ्या सिनेमांमधून ‘चिकनी चमेली’, ‘मेरा नाम मेरी है’सारखी आयटम नंबर्स बरीच गाजली असताना करणने घेतलेली ही भूमिका विशेष महत्त्वाची ठरते.

एका वेबसाईटशी बोलताना करण जोहरने बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना एखाद्या वस्तूप्रमाणे दाखवण्याच्या वृत्तीवर ताशेरे ओढले. त्याचबरोबर स्वत:च्या सिनेमांमधून महिलांचे जे अंगप्रदर्शन दाखवण्यात आले त्याबद्दल त्याने अप्रत्यक्षपणे माफीही मागितली. ‘जेव्हा तुम्ही एखाद्या महिलेला हजारो पुरुषांमध्ये नाचताना दाखवता आणि ते त्या महिलेकडे एखादी उपभोगाची वस्तू म्हणून पाहत असताना चित्रित करता तेव्हाच तुम्ही चुकीचे उदाहरण प्रेक्षकांसमोर ठेवता. एक निर्माता म्हणून मीसुद्धा या गोष्टी केल्या आहेत. या चुका माझ्या हातूनही झाल्या आहेत. मात्र भविष्यात असा प्रकार मी पुन्हा कधीच करणार नाही,’ असे करण म्हणाला.

VIDEO : असा साकारला ‘पद्मावती’चा शाही पोशाख

आजच्या स्पर्धेच्या युगात एखाद्या निर्मात्याने अशाप्रकारची भूमिका घेणे खरेच कौतुकाचे आहे. मात्र करणने दिलेला शब्द तो आपल्या सिनेमांमधून पाळतो का हे येत्या काळात स्पष्ट होईलच.