मनोरंजन विश्वामध्ये हल्ली विविध मार्गांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा घाट घातला जात आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांच्या काही हटके कल्पनांची सांगड घालत रिअॅलिटी शो ही संकल्पनासुद्धा आता मनोरंजन विश्वामध्ये चांगलीच तग धरु लागली आहे. गाण्याच्या रिअॅलिटी शो पासून ते अगदी वेगळ्या धाटणीच्या काही रिअॅलिटी शोंनी प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रिअॅलिटी शो तरुणाईला जास्तच हवेहवेसे वाटतात. तरुणाईचा असाच एक आवडीचा रिअॅलिटी शो म्हणजे ‘रोडिज’.

सळसळत्या रक्ताच्या तरुणाईचा उत्साह, समयसूचकता, चालू घडामोडींबद्दल त्यांना असणारी माहिती आणि एकंदर रोडिजचा किताब पटकावण्यासाठी असणारे वेड या साऱ्याचा मेळ रोडिज या कार्यक्रमात पाहायला मिळतो. गेल्या कित्येक वर्षांपासून रोडिज हा क्रार्यक्रम चाहत्यांना चांगलीच भुरळ घालत आहे. रोडिजचे नवे पर्व ‘रोडिज राइझिंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे तो म्हणजे त्याच्या ऑडिशन्समुळे. इन्स्टाग्राम वर नुकताच पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये रोडिजच्या ऑडिशनमध्ये करण कुंद्रा दोन स्पर्धकांच्या अंगवर धावून जाताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर एका स्पर्धकाच्या त्याने कानशिलात लगावल्याचेही पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/BQjyqogg9xU/

रोडिज हा शो त्याच्या वेगळ्या स्वरुपामुळे आणि ऑडिशन्समुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा रघु आणि राजीव राम स्पर्धकांच्या ऑडिशन्स घेताना असेच काही प्रकार घडल्याचेही पाहायला मिळाले होते. दरम्यान हे सर्व काही त्या कार्यक्रमाचा टीआरपी वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता नेमका करणचा पारा टीआरपी वाढविण्याच्या कारणामुळे चढला आहे, की त्या स्पर्धकाच्या चुकीमुळे हे कार्यक्रमाचा भाग प्रदर्शित झाल्यावरच उघड होणार आहे.