काही दिवसांपूर्वी ‘कारभारी लयभारी’ या मालिकेतील अभिनेत्री गंगा हिला काही अज्ञातांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर गंगाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपबिती सांगितली होती . विशेष म्हणजे तिच्यावर बेतलेल्या या धक्कादायक प्रसंगाची पोलिसांनी दखल घेत तिला तात्काळ मदत केली. त्यामुळे गंगाने आणखी एक व्हिडीओ शेअर करत पोलिसांचे आभार मानले आहेत.
“आज मी हा खास व्हिडीओ करत आहे. आता मी थोडी बरी आहे. जो काही प्रसंग घडला त्यातून मी सावरले आहे, आणि लवकरच पूर्ण बरी होईन. पण, या व्हिडीओच्या माध्यमातून मला अनेकांचे आभार मानायचे आहेत. सगळ्यात प्रथम मुंबई पोलीस, मुंबई कमिश्नर यांचे अगदी मनापासून आभार. त्यांनीच मला प्रथम मदतीचा हात दिला. या गोष्टीसाठी मी आयुष्भर तुमची ऋणी राहिन. त्यानंतर दुसरे आभार पंतनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांचे त्यांनीदेखील एकही सेकंद व्यर्थ न घालवता मला मदत केली, आणि तिसरे आभार तुम्हा सगळ्या रसिकप्रेक्षकांचे. तुम्ही इतकं सगळं माझ्यावर मनापासून प्रेम केलंत. असंच प्रेम कायम करत राहा”, असं म्हणत गंगाने व्हिडीओ शेअर करुन सगळ्यांचे आभार मानले.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
कारभारी लयभारी या मालिकेचं चित्रीकरण संपल्यानंतर गंगा घरी जाण्यास निघाली होती. यावेळी नेहमीप्रमाणे बसची वाट पाहत असताना काही अज्ञात तरुण बसस्टॉपवर आले आणि त्यांनी अचानकपणे गंगाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे घाबरलेल्या गंगाने एक रिक्षा पकडून घर गाठलं. याच प्रवासात रिक्षात असताना गंगाने एक व्हिडीओ शूट करुन आपबिती सांगितली.
कोण आहे गंगा?
गंगा एक ट्रान्सजेंडर असून ‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोच्या माध्यमातून प्रकाशझोतात आली. या शोनंतर गंगाच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली असून आज ती मराठी कलाविश्वात अभिनेत्री म्हणून तिचं नशीब आजमावत आहे. गंगाचं खरं नाव प्रविण हाटे आहे. सध्या ती कारभारी लयभारी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2021 9:35 am