अभिनेत्री करिना कपूर खान बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अगदी गरोदरपणापासून ते गरोदरपणनंतरही विविध रुपांमध्ये सर्वांसमोर येणाऱ्या बेबोच्या अदांनी अनेकांनाच घायाळ केले आहे. करिनाने तिच्या गरोदरपणाच्या काळातही विविध कार्यक्रम, जाहिराती आणि बऱ्याच कामांमध्ये स्वत:ला व्यग्र ठेवत प्रत्येक क्षणाचा अगदी मनुमराद आनंद घेतला. आतासुद्धा करिना अनेकांच्याच मनावर राज्य करत आहे ते म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमुळे. अनिता डोंगरेचे कलेक्शन सादर करण्यासाठी करिना रॅम्पवर उतरली होती.

त्यावेळी त्याठिकाणी उपस्थितांच्या नजरा फक्त आणि फक्त करिनावरच खिळल्या होत्या. लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या फॅशन शो दरम्यान रॅम्पवर आलेल्या करिनावर यावेळी प्रसारमाध्यमांनी प्रश्नांचा भडीमारही केला. तेव्हा सर्वांच्याच प्रश्नांना उत्तरे देत करिनाने सैफ आणि छोटे नवाब तैमुर अली खान यांच्यामध्ये असलेल्या नात्यावरुनही पडदा उचलला. तू तैमुरच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पुन्हा एकदा रॅम्वर परतली आहेस, सर्व गोष्टींचा मेळ तू कसा साधत आहेस? असा प्रश्न करिनाला विचारला असता ती म्हणली, ‘मी नेहमीच सर्व गोष्टींमध्ये समतोल राखला आहे. या क्षेत्रात पुनरागमन करणं खुपच छान आहे. मी हे गरोदरपणातही म्हटले होते, की हा काळ काही आजारपणाचा काळ नव्हता. मी रॅम्पवर आज चालले आहे आणि यापुढेही चालेन कारण मला या सर्व गोष्टी आवडतात. मला माहितीये की काहीजणांना असे करणे कठिण जाते. त्यांना त्यांच्या बदललेल्या शरीराच्या बांध्याबद्दल संकोचलेपणा वाटतो. पण, रॅम्पवर चालण्यासाठी आत्मविश्वास लागतो जो माझ्यात आहे’, असे करिना म्हणाली.

त्यानंतर सैफच्या आणि तैमुरच्या नात्याविषयी प्रश्न विचारले असता करिना म्हणाली, ‘सैफ तैमुरच्या सर्वच गोष्टींमध्ये हातभार लावतो. किंबहुना तो माझ्याकडे ज्या भावनेने पाहतो त्याहीपेक्षा जास्त आपलेपणाच्या भावनेने तो तैमुरकडे पाहतो. त्यामुळे तैमुरसोबतच्या त्याच्या नात्यामध्ये एक विशेष असा बंध निर्माण झाला आहे असे म्हणावे लागेल. तो तैमुरचे डायपर बदलण्याचे कामही करतो’, असेही करिनाने यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे बॉलिवूडची ही बेगम सध्या तिच्या मातृत्वाता आनंद घेत आहे असेच म्हणावे लागेल.
kareena-1

kareena-2

kareena-3