इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ हा चित्रपट आजही अनेकजण आवर्जून पाहतात. करिना कपूर, शाहिद कपूर या जोडीची धमाल केमिस्ट्री असलेल्या या चित्रपटाच्या कथानकापासून ते संगीतापर्यंत सर्वत गोष्टींनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. या चित्रपटाला तब्बल तेरा वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या या चित्रपटाने त्या वेळी काही विक्रमही प्रस्थापित केले होते. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो पोस्ट करत करीनाने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. ज्यामध्ये करीना व तिच्यासोबत मिळून शाहिद कपूर आणि इम्तियाज अली हे शूट कसं झालं ते पाहताना दिसतायत. ‘जब वी मेट’मधील संवाद आजही अनेकांना तोंडपाठ आहेत. त्यातीलच एक डायलॉग करीनाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. ‘मुझे तो लगता है लाइफ मे जो कुछ इन्सान रिअल मे चाहता है, अॅक्चुअल मे उसे वो ही मिलता है’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं.
तेरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने इम्तियाजच्या कारकिर्दीला कलाटणी देऊन गेला होता. दिग्दर्शक म्हणून हा त्याचा दुसरा चित्रपट होता. याआधी त्याने ‘सोचा न था’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. पण, त्या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली नाही. पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर मात्र इम्तियाज बराच सजग झाला आणि त्याने फॅमिली ड्रामा, भारतीय संस्कृती, प्रेम या सर्व गोष्टी एकवटत ‘जब वी मेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 9:30 am