सिनेमा
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com

‘तीन आत्मभान हरवलेल्या व्यक्ती, दोन शवपेटय़ा आणि आयुष्यातील अनघड प्रवास’.. ‘कारवाँ’ चित्रपटाची या अर्थाच्या जवळ जाणारी ‘टॅगलाइन’ वाचली आणि आपसूक त्याच तऱ्हेचे चित्रपट आठवू लागले. म्हणजे पाहा की, या ‘कारवाँ’मधल्या तीनही व्यक्तिरेखा आपापल्या श्रेयसाच्या शोधात असतात. कुणी वडिलांची हरवलेली शवपेटी शोधतोय, कुणी त्याला त्यात मदत करताकरता स्वत:च्या वडिलांचा शोध घेतोय तर कुणी स्वघोषित बंडखोर आहे आणि तिला स्वत:ला शोधायचं आहे. मध्यंतरी आलेल्या ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटातल्या नायक-नायिकेची ओळख एका डेटिंग साइटच्या निमित्तानं होते. नायकाच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींना भेटायला म्हणून दोघं प्रवासाला निघतात. त्या प्रवासाची आणि त्या दरम्यान फुलणाऱ्या नात्याची ही हकिगत आहे. त्याहीआधी आलेला ‘धनक’ हा राष्ट्रीय पातळीवर नावाजला गेलेला चित्रपट. दोन्ही बालकलाकारांची भन्नाट भूमिका. जिवापाड एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन भावंडांची ही गोष्ट. ही दोघं आपला लाडका हिरो शाहरुखखानला मदतीसाठी साकडं घालायचं ठरवतात. तेव्हा ‘रंगिल्या राजस्थाना’तल्या त्यांच्या या प्रवासात अनुभवांचं इंद्रधनुष्य उमटतं..

भराभरा आणखीन चित्रपटांची जणू रांगच लागते डोक्यात. प्रवासाला निघालेल्या एखाद्या जणू वाटेत वेगवेगळे थांबेच लागावेत.. चटकन आठवतो ‘क्वीन’. एका लग्नाची गोष्ट फसते. तरीही न डगमगता नायिका हनिमूनच्या ठरलेल्या ठिकाणी प्रवासाला जायचा निश्चय मनाशी करते आणि तो अमलात आणते. परदेशातही आपली माणसं शोधणाऱ्या आणि ती गवसणाऱ्या या नायिकेला इथले नानाविध अनुभव समृद्ध करतात आणि आत्मविश्वासाचं दान तिला मिळतं. हे सारं घडतं ते तिच्या प्रवासादरम्यान. तर ‘हायवे’मध्ये होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेलेल्या नायिकेचं अपहरण होतं. अपहरणकर्ता तिला एका जागी न ठेवता फिरत राहतो. या ‘हायवे’वरच्या प्रवासादरम्यान तिनं ज्या गोष्टींची आस मनाशी बाळगली होती, त्या स्वप्नात, सत्यात प्रत्यक्ष घडतात आणि कथेतली वळणं येत राहातात.. ‘तमाशा’मधला स्टोरीटेलर होण्याची मनीषा बाळगणारा नायक नायिकेला भेटतो, ते पुन्हा भेटायचं नाही हे पक्कं ठरवूनच. मात्र नियती त्यांची पुन्हा भेट घडवतेच. एका मुखवटय़ाच्या मागं दडलेल्या ‘मी’ला शोधताना नायकाचा झालेला प्रवास म्हणूनच लक्षणीय ठरतो. तर ‘रोड’ हेच चित्रपटाचं नाव असलेल्या कथेत नायक-नायिका पळून जाऊन लग्न करायचा घाट घालतात. त्या प्रवासात भेटलेल्या भामटय़ामुळं त्यांच्या कथेच्या प्रवासाला निराळीच कलाटणी मिळते.

रोड ट्रिपवरचे चित्रपट आणि मत्री हे समीकरण कथाकारांना-दिग्दर्शकांना पुन्हा पुन्हा साकार करावंसं वाटतं, यातच या विषयाचं महत्त्व अधोरेखित होतं. मग ते ‘चित्रपट दिल चाहता हैं’ असो किंवा ‘थ्री इडियटस्’ असो. त्यातली मत्री, त्यातल्या व्यक्तिरेखांचा प्रवास हे सारं बढिया ठरतं. ‘ये जवानी हैं दिवानी’ या चित्रपटातील बिनधास्त नायकाला जगभर फिरावंसं वाटतं. जग नाही पण मनालीच्या ट्रेकिंगला तो मित्र-मत्रिणींसोबत जातो. त्या प्रवासात कथेची वळणं येत राहातात आणि चित्रपट पुढं सरकतो. मधल्या काळातला ‘पिकू’ हा चित्रपट एकाच वेळी मुलगी-वडिलांमधलं मित्रत्वाचं आणि आदराचं नातं रेखाटतो आणि त्याच वेळी दिल्ली-कोलकोता प्रवासात अपरिहार्य कारणामुळं कारमालकाला चालक व्हावं लागल्यानं त्या प्रवासात त्याची मुलीशी होणारी मत्री नि पर्यायानं पुढच्या नात्याचा प्रवासही आपसूकच सूचित केला जातो. ‘बर्फी’मधला झिलमिल आणि बर्फीच्या नात्याचा प्रवास शब्दांत पकडण्यापेक्षा पडद्यावर पाहणं उचित ठरेल. त्याच वेळी ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’मधले तीन मित्र, त्यांच्या आयुष्यातले पेचप्रसंग आणि त्या पेचांना कलाटणी देणारा त्यांचा प्रवास हाही तितकाच भारी ठरतो.

या सगळ्या प्रवासी कथांमधल्या व्यक्तिरेखा आपल्या चांगल्या लक्षात राहातात. कारण त्या तितक्याच ताकदीनं लिहिल्या गेल्या आहेत आणि तितक्याच जोमानं अभिनित केल्या गेल्या आहेत. इरफान खान, कंगणा राणावत, अलिया भट, रणवीर सिंग, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, फरहान अख्तर, हृतिक रोशन, अभय देओल, रणदीप हुडा आदी कलाकारांच्या अभिनयाचे चार चांद या भूमिकांना लाभले आहेत. यातले सगळेच चित्रपट रोड ट्रिपवर आधारलेले नसले तरीही रस्त्यावर त्यांनी केलेला प्रवास, पर्यायानं त्यांचा आत्मशोध, त्यांच्या ध्येयापर्यंतच्या वेगळ्या वाटा असल्या तरी तो प्रवास सुंदर होता असा ‘टॅग’ या चित्रपटांना नक्कीच लागू शकतो.
सौजन्य – लोकप्रभा