काही वर्षांपूर्वी आलेली ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: गाजली होती. या मालिकेतील प्रेरणा -अनुरागची जोडी प्रचंड गाजली होती. त्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे. या मालिकेचा सीक्वल लवकरच येणार असून यात अभिनेत्री एरिका फर्नांडिस प्रेरणाची भूमिका साकारणार आहे.

‘कसौटी जिंदगी..’च्या सीक्वलची चर्चा सुरु झाल्यापासून या मालिकेविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे लोकप्रिय ठरलेल्या प्रेरणाच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री एरिका कशी दिसेल याकडे साऱ्यांच लक्ष वेधलं आहे. याचदरम्यान चित्रीकरणाच्या सेटवरुन एरिकाचे काही फोटो लीक झाल्याचं समोर आलं आहे.

१० सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या मालिकेचं सध्या चित्रीकरण सुरु असून सेटवरील काही फोटो फॅन पेजच्या माध्यमातून लीक झाले आहेत. त्यामुळे सध्या एरिकाचा नवा प्रेरणा लूक मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे एरिका प्रेरणाच्या लूकमध्ये परफेक्ट दिसत असून चेहऱ्यावरील तो निरागसपणा झळकून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एरिकाने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. त्याबरोबरच केस मोकळेदेखील सोडले आहेत. त्यामुळे एरिका प्रेरणाच्या भूमिकेला न्याय देईल असं एकंदरीतच दिसून येत आहे.