कतरिना कैफचे वर्षभरात तिन्ही खानसोबत तीन बिग बजेट चित्रपट आले. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘रेस ३’ च्या अपयशानंतर कतरिनाचा आमिर खानसोबत आलेला ‘ठग्ज् ऑफ हिंदोस्तान’ही चांगलाच आदळला. गेल्याच आठवड्यात आलेला ‘झिरो’ हादेखील प्रेक्षकांची मनं जिंकण्यास अपयशी ठरला. मात्र या चित्रपटातील कतरिनाच्या अभिनयाचं शाहरूख, अनुष्काच्या अभिनयाइतकंच कौतुक झालं.

या चित्रपटात कतरिनानं साकारलेली बबिता कुमारी ही कतरिनाच्या खऱ्या आयुष्यातील प्रसंगाशी अगदीच मिळती जुळती असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. सुपरस्टार बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालेल्या अभिनेत्री बबिता कुमारीची भूमिका कतरिनानं ‘झिरो’मध्ये साकारली आहे. ही भूमिका तिच्या खासगी आयुष्यातील प्रसंगावर आधारलेली असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. चित्रपटात अभय देओलनं बबिता कुमारीच्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. यात अभयचं नाव आदित्य कपूर ठेवण्यात आलं आहे. याच कारणामुळे रणबीर कपूर नाराज असून त्यानं ‘झिरो’ चित्रपट न पाहण्याचं ठरवलं असल्याच्या चर्चाही बॉलिवूडमध्ये आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल कतरिनाला विचारलं असता तिनं, ही भूमिका तिच्या खासगी आयुष्यातून प्रेरित नसल्याचं म्हटलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण ‘बबिता कुमारी हे पात्र माझ्या भूतकाळाशी जोडण्याचा प्रयत्न करतील मात्र खऱ्या आयुष्यात मी तिच्यासारखी अजिबात नाही. माझ्या आणि तिच्या वागण्यात खूपच तफावत आहे’ असं म्हणत तिनं चर्चांना पूर्णविराम दिला आहे.