सध्या सिनेसृष्टीत बायोपिक्सची चलती आहे. खेळाडूंच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवणं हा तर निर्मात्यांचा आवडता विषय आहे. ‘मेरी कोम’, ‘मिल्खा सिंग’, ‘महेंद्रसिंग धोनी’ अशा खेळाडूंच्या चरित्रपटांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आता अर्जुन पुरस्कार विजेती भारताची सुवर्ण कन्या पी.टी.उषा यांच्या जीवनावर आधारीत एक चित्रपट येणार आहे.

‘भारत’च्या तुफान यशानंतर कतरिना सध्या रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये काम करणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, कतरिना धावपटू पी.टी.उषा यांच्या भूमिकेत दिसणार आहे अशा अनेक चर्चा होत्या. कतरिनाला याबाबत विचारले असता ती म्हणाली की, “आम्ही याविषयी चर्चा करत आहोत. अजून नक्की काहीच ठरलेले नसल्यामुळे मी याविषयी अधिक सांगू शकत नाही.”

पिंकव्हीलाच्या वृत्तानुसार, अजून एका अभिनेत्रीचा या चित्रपटासाठी विचार सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, “जॅकलिन फर्नांडीसला सुद्धा या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. जॅकलिन अभिनयाचा एक कोर्स पूर्ण करून नुकतीच मुंबईत परतली आहे. या चित्रपटाविषयी चर्चा करण्यासाठी जॅकलिनने नुकतीच दिग्दर्शिकेची भेट घेतली आहे. जॅकलिनलाही सध्या अभिनयक्षेत्रात विविध प्रयोग करायचे आहेत. ‘अर्थ’ चित्रपटाच्या रिमेकसाठीही जॅकलिनला विचारण्यात आले आहे.”

२०१७ पासून पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा होती.मात्र काही कारणास्तव हा बायोपिकचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दिग्दर्शख रेवती एस.वर्मा यांनी या बायोपिकसाठी कंबर कसली आहे.