बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं प्रेमप्रकरण जुळेल, फिस्कटेल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर चक्क आलिया भट्टच्या प्रेमात पडला आहे. खरं तर रणबीरचं नाव याआधी सोनम मग दीपिका आणि नंतर कतरिना कैफशी जोडलं गेलं. त्यातली सोनम वगळता दीपिका आणि कतरिनानं आपल्या दोघांचं नातं खुलेपणानं मान्यदेखील केलं. रणबीरच्या प्रेमात त्याकाळी आकंठ बुडालेल्या दीपीकानं तर चक्क त्याच्या नावाचा टॅटूही काढून घेतला होता. पण अखेर तिच्याच काय पण कतरिनाच्या वाट्याला निराशा सोडून काहीच आलं नाही.

वाचा : अखेर रणबीरने दिली आलियासोबतच्या नात्याची कबुली, म्हणाला…

दीपिकानं या नात्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. कतरिना अजूनही सावरतेय असं तिच्या जवळच्या व्यक्तीनं मान्यदेखील पण, आता मात्र रणबीरचे तिची सर्वात जवळची मैत्रिण आलियासोबत जुळलेले सूत पाहता कतरिना दुखावली आहे. सोनमच्या लग्नात २५ वर्षांची आलिया आणि रणबीर एकत्र पाहायला मिळाले. या दोघांमधली जवळीक त्यावेळी माध्यमांच्याच काय पण इतर कलाकारांच्या नजरेतूनही सुटली नाही. त्यामुळे त्या दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या नात्याची चर्चा सोशल मीडियापासून ते बी टाऊनमध्येही पाहायला मिळाली आणि याच गोष्टीमुळे कतरिना दुखावली गेल्याचं म्हटलं जातं आहे.

‘ज्यावेळी माझा विश्वास बसेन तेव्हा मी ते पाहिन किंवा ज्यावेळी मी स्वत: पाहिन तेव्हाच त्यावर विश्वास ठेवीन’ असं कोड्यात लिहीत तिनं इन्स्टाग्रामवर हे पोस्ट केलं होतं. खरं तर हा संदेश तिनं जिवलग मैत्रिण आलिया आणि पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीरसाठी लिहला असल्याचं म्हटलं जात आहे. आलियानं रणबीरवर आपलं पहिल्यापासूनच क्रश असल्याचं मान्य केलं तर रणबीरनं देखील गेल्या आठवड्यात दिलेल्या मुलाखतीत आलियाला डेट करत असल्याचं सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे जिथे तिथे या दोघांच्याही नात्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

खरं तर आलिया आणि कतरिना या बॉलिवूडमधल्या जीवलग मैत्रिणी आहेत. अनेकदा आलिया कतरिनासोबत वेळ घालवणं पसंत करते पण, गेल्याकाही दिवसांपासून रणबीरमुळे आलिया आपल्या जीवलग मैत्रीणीलाही टाळत असल्याचं समजत आहे आणि यासगळ्यामुळे दुखावलेल्या कतरिनानं या पोस्टद्वारे आपली नाराजी व्यक्त केलीय असं म्हटलं जात आहे.